उंडाळ्यातील दोन बंधूंमध्ये पुन्हा संघर्ष 
सातारा

Satara ZP Election : उंडाळ्यातील दोन बंधूंमध्ये पुन्हा संघर्ष

ॲड. उदयसिंह पाटील यांच्या प्रतिष्ठेची तर ॲड. राजाभाऊचे अस्तित्वाची निवडणूक

पुढारी वृत्तसेवा

वैभव पाटील

उंडाळे : ज्येष्ठ काँग्रेस नेेते स्व. विलासराव पाटील उंडाळकर यांच्या कुटुंबातील राजकीय कलह जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा उफाळून आला आहे. ॲड. उदयसिंह पाटील आणि ॲड. आनंदराव पाटील हे सख्खे चुलत बंधू राष्ट्रवादी अजित पवार गटात असल्याने जिल्हा परिषद निवडणुकीत काय होणार? याची उत्सुकता संपूर्ण जिल्ह्याला मागील काही दिवसांपासून होती. मात्र राष्ट्रवादीची उमेदवारी ॲड. उदयसिंह पाटील यांना मिळाल्यानंतर अपक्ष उमेदवार म्हणून लढणाऱ्या ॲड. आनंदराव पाटील यांनी भाजपचा पाठिंबा मिळविला आहे. यापूर्वीच्या निवडणुकीतही या दोघा बंधूमध्येच लढत झाली होती आणि आता पुन्हा हे दोघे आमनेसामने असल्याने या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

सातारा जिल्ह्यातील लक्षवेधी लढतीपैकी एक लढत म्हणून कराड तालुक्यातील येळगाव जिल्हा परिषद गटाकडे पाहिले जात आहे. काँग्रेस नेते स्व. विलासराव पाटील उंडाळकर यांनी सुमारे 35 वर्षे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तर त्याचे पुत्र ॲड. उदयसिंह पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून यापूर्वी काम पाहिले आहे. उंडाळकर पिता-पुत्र काँग्रेसमध्ये असल्याने ॲड. पाटील यांचे सख्खे चुलत बंधू ॲड. आनंदराव ऊर्फ राजाभाऊ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

मागील वर्षी ॲड. उदयसिंह पाटील यांनी काँग्रेसचा हात सोडत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतरही दोघा बंधूमधील राजकीय मतभेद दूर होतील की नाहीत? याकडे सर्वाचेच लक्ष होते. ॲड. उदयसिंह पाटील यांनी 2017 साली झालेल्या निवडणुकीत रयत संघटनेच्या माध्यमातून कराड तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत विलासराव पाटील यांच्या डोळ्यासमोरच ॲड. उदयसिंह पाटील यांच्या विरोधात ॲड. राजाभाऊ यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत ॲड. उदयसिंह पाटील यांचा विजय झाला होता. त्यानंतर तब्बल 9 वर्षांनी होत असलेल्या या निवडणुकीत दोन्ही भाऊ पुन्हा एकदा समोरासमोर आले आहेत. या दोघाशिवाय अन्य एकही अर्ज दाखल झाला नसल्याने अखेरच्या क्षणी निवडणूक बिनविरोध होणार का? अपक्ष म्हणून रिंगणात असणाऱ्या राजाभाऊंच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष असतानाच भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबांशी चर्चा करत त्यांनी भाजपचा पाठिंबा मिळविला आणि आता दोघांमध्ये राजकीय संघर्ष होत आहे.

दोन्ही बंधूंचे वडील नसताना होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. ॲड. राजाभाऊ यांचे राजकीय भविष्य ठरविणारी ही निवडणूक मानली जात आहे. तर ॲड. उदयसिंह पाटील यांच्यावर खांद्यावर संपूर्ण तालुक्यातील राष्ट्रवादीची धुरा आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांकडूनही त्यांच्याकडे आशेने पाहिले जात असून त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळेच या गटातील निवडणुकीकडे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. ॲड. उदयसिंह पाटील हे स्वतःच्या ताकदीवर लढत आहेत. ॲड. राजाभाऊ पाटील यांना आमदार डॉ. अतुल भोसले यांच्याकडून ताकद मिळत असल्याने दोन भावांमधील लढत चर्चेचा विषय बनली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT