सातारा : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेची राज्यस्तर कार्यकारिणीची विशेष सभा रविवारी सातारा जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात झाली. सभेत एम एफ एस परीक्षा रद्द करण्याची एकमुखी मागणीसह खुल्लर समिती वेतन त्रुटी अहवालाचा निषेध व्यक्त करण्यात आला.
लेखा संघटनेचे राज्य अध्यक्ष मिलिंद कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत राज्य शासनाच्या धर्तीवर सहाय्यक लेखाधिकारी पदोन्नतीसाठी आवश्यक असलेली महाराष्ट्र जिल्हा परिषद वित्त व लेखा सेवा वर्ग 3 परीक्षा रद्द करणे, 10, 20, 30 वर्षाच्या सेवेनंतर मिळणारा आश्वासित प्रगती योजना लाभ देताना परीक्षा उत्तीर्ण अट काढणे, संघटनेला औद्योगिक व कामगार न्यायालयाची मान्यता घेणे, वेतन त्रुटी नागपूर कोर्ट केस पाठपुरावा करणे यासह विविध विषयांवर चर्चा होऊन ठराव संमत करण्यात आले. खुल्लर समितीने वेतन त्रुटी अहवालात लेखा संवर्गाला डावलल्याने समितीचा तीव्र निषेध करण्यात आला. सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांच्या विशेष अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. राज्य संघटनेकडून नवनिर्वाचित सातारा जिल्हा अध्यक्ष विश्वनाथ काटकर यांचा सत्कार करण्यात आला.
सभेस सरचिटणीस प्रशांत सुतार, कोषाध्यक्ष चंद्रशेखर फसाळे, कार्याध्यक्ष पवन तलवारे, तसेच विभागीय उपाध्यक्ष, पदाधिकारी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. प्रास्तविक रवींद्र बोरकर यांनी केले. सूत्रसंचलन दत्तात्रय खराडे यांनी केले. विजय कुंभार यांनी आभार मानले. सभा यशस्वी करण्यासाठी जिल्हा कार्यकारणीचे सुनील पवार, संतोष शिंदे, वैभव कदम, शिवराम सगभोर, शरद देशमुख यांच्यासह महिला पदाधिकारी व सर्व लेखा कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.