उंब्रज : उंबज ता.कराड येथील विद्यानगर येथे बंद घराचा दरवाजा फोडून अज्ञात चोरटयांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवार दि. 21 रोजी सकाळी 9.30च्या सुमारास उघडकीस आली.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,उंब्रज (विद्यानगर) येथील सागर विलास सूर्यवंशी हे पुणे (चाकण) येथे व्यवसायानिमित्त कुटुंबियासमवेत वास्तव्यास आहेत. बुधवारी सकाळी पेपर टाकणाऱ्या युवकाला सागर सूर्यवंशी यांच्या घराचा मुख्य दरवाजा अर्धवट स्थितीत उघडा असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ सागर यांचे चुलते विजयकुमार सूर्यवंशी यांच्या निदर्शनास आणले असता सदरचा प्रकार उघडकीस आला.
अज्ञात चोरटयांनी बंद घराचा सेफ्टी दरवाजा, मुख्य दरवाजा तसेच बेडरुमचा दरवाजा कटावणीच्या सहाय्याने उचकटला आहे. बेडरुम मधील लोखंडी कपाट व कपाटातील ड्राव्हर कटावणीच्या सहाय्याने उचकटून कपाटातील सुमारे 4 लाख रुपये किंमतीचा 4 तोळे सोन्याचा ऐवज लंपास केला आहे. कपाटातील कपडे व इतर साहित्य आहे त्या स्थितीत असल्याने चोरटयांनी फक्त सोन्याच्या दागिण्यावर डल्ला मारला असल्याचे प्रथम दर्शनी सिध्द झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उंब्रज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र भोरे, पो.ह. धुमाळ यांनी भेट देवून पाहणी केली.तसेच घटनास्थळी श्वान पथक व ठसे तज्ञाना पाचारण करण्यात आले होते. घटनेची नोंद उंब्रज पोलिस ठाण्यात झाली असून, अधिक तपास सपोनि. रविंद्र भोरे करीत आहेत.