उंब्रज : उंब्रज (ता. कराड) येथील उंब्रज-पाटण मार्गावर महावितरण कंपनीच्या संरक्षक भिंतीला असलेल्या एका चप्पल दुकानाला अचानक आग लागल्याने दुकान जळून खाक झाले. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीची झळ शेजारील अन्य दुकानांना लागली आहे. सदरची घटना बुधवार दि.25 मार्च रोजी सकाळी 9.30 च्या सुमारास घडली असून, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पाटण-पंढरपूर राज्यमार्गावर महावितरण कंपनीच्या संरक्षक भिंतीला लागून असलेल्या दुकानांपैकी एका चप्पल दुकानाला बुधवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आगीची माहिती स्थानिक नागरिकांना तसेच पोलिसांना समजतात तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने आगीची धग रस्त्यापर्यंत येत होती.
यावेळी आग लागलेल्या दुकानाच्या शेजारील दुकानांना आगीची झळ बसली. उपस्थित नागरिकांनी प्रसंगावधान राखून व्यावसायिकांनी दुकानातील फर्निचर यासह अन्य साहित्य बाहेर काढले. यादरम्यान नागरिकांनी गावातील पाणी सप्लायर यांना पाचरण करण्यात आल्याने आग विझविण्यात यश आले.