कराड : महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला वेग देणारा महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील दोन एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी एकूण 258.99 कोटींच्या निधीस मंजुरी दिली आहे. त्यापैकी सातारा जिल्ह्यातील उंब्रज येथे पारदर्शक उड्डाणपुलाचे काम चालू करण्याचा विषय समाविष्ट आहे, अशी माहिती आ. मनोज घोरपडे यांनी दिली.
आ. मनोज घोरपडे यांनी सांगितले की, उंब्रज येथील या प्रकल्पासाठी 133.45 कोटींची तरतूद करण्यात आली असून, त्यामध्ये स्लिप रोड व सर्व्हिस रोडचाही समावेश आहे, असे सांगत आ. मनोज घोरपडे म्हणाले, कागल ते सातारा या सहापदरीकरण प्रकल्पांतर्गत उंब्रज शहरातून जाणाऱ्या महामार्गावर वाढती वाहतूक, वारंवार होणारी कोंडी आणि अपघातांचा धोका लक्षात घेता स्थानिक नागरिकांनी फ्लायओव्हरची मागणी केली होती. अखेर 13 फेब्रुवारी 2026 रोजी या ब्रिज सेगमेंटल पूलाच्या ट्रेंडरला मंजुरी मिळाली आहे.
एकूण प्रकल्प खर्च 140.91 कोटी असून अंदाजित बांधकाम खर्च 107.98 कोटी आहे. पूर्णत्व कालावधी 2 वर्षे असून देखभाल कालावधी 10 वर्षांचा आहे. एकूण लांबी 1300 मीटर (दोन्ही रॅम्पसह) असून मुख्य उंच पूल 810 मीटर आहे. रॅम्प 490 मीटर (दोन्ही बाजूंनी) आहे. उंब्रज शहरातील वाहतुकीची समस्या लक्षात घेऊन हा एलिव्हेटेड कॉरिडॉर महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. उंब्रज येथील उड्डाणपूलामुळे शहरातील वाहतूक कोंडी पूर्णपणे बंद होणार असून स्थानिक व्यापारी व नागरिकांना याचा फायदा होणार आहे.