सातारा : सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील जावली, महाबळेश्वर, सातारा आणि पाटण तालुक्यातील कुंटुंबांना हरित वन सदृष्य परिस्थितीचा तडाखा बसत आहे. यामुळे अनेकांवर बेघर होण्याची वेळ येणार असेल तर ते कोणालाच मान्य होणार नाही. येथील रहिवाशांवर अनेक दशकांच्या रहिवासावर गंडांतर आणणारे आहे. याबाबत तातडीने पुनर्विचार झाला पाहिजे अन्यथा येथील जनतेवर अन्याय करत, निसर्गच जीवावर उठवण्याची सल कायम बोचत राहील, अशी परखड प्रतिक्रीया खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
याबाबत दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, जिल्ह्याच्या पश्चिम भागातील रहिवाशांवर आधीच सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, जागतिक वारसा स्थळे, वेस्टर्न घाट एक्सपर्ट समिती, इको-सेन्सीटीव्ह झेान, बफर झोन यामुळे प्रचंड मर्यादा आल्या आहेत. त्यातच जिऑग्रॉफिकल सर्व्हेमळे ज्या भागात ग्रीनरी जास्त आहे त्या भागातील म्हणजेच पसरणी ते महाबळेश्वर, पाटण ते तापोळा-बामणोली, अश्या परिसरात काही शतकांपासून वास्तव्य असणार्या कुटुंबावर वनसदृष्य परिस्थिती आढळल्याने गंडांतर येण्याची चिन्हे आहेत. येथील जनतेने वृक्षांचे संगोपन केल्यानेच येथे घनदाट झाडी आढळून आली आहे. यामुळे विकास तर सोडाच पण त्यांचा रहिवासही नाकारला जात आहे. वाढत्या कुटुंबामुळे येथील रहिवाशांची एफएसआय वाढवून देण्याची मागणी धुळखात पडलेली आहे. वृक्ष संवर्धन केल्यानेच त्यांच्यावर आता पश्चातापाची वेळ आली आहे.
पर्यावरण टिकवणारे नागरिक पर्यावरणाच्या नावाखाली मुलभूत सुविधापासून वंचित राहता कामा नयेत. वनसदृष्य रहिवासी भागासाठी वन जमिनीमध्ये किमान 3 मीटर रुंदीचा रस्ता, पाणी वितरण व्यवस्था, घनकचरा व सांडपाणी प्रक्रीया या मुलभूत सुविधासाठी स्थानिक स्तरावर परवानगी देण्याची व्यवस्था केली गेली पाहिजे. ही वस्तुस्थिती केंद्रीय मंत्री ना.भुपेंद्रसिंह यादव आणि राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांना निदर्शनास आणून देणार आहे. पिढयानपिढया गेली अनेक दशके राहात असलेल्या कुटुंबावर येणारे गंडातर टाळयासाठी त्यांच्या रहिवास रक्षणासाठी प्रयत्न करणार आहे.
सह्याद्री वेस्टर्नघाटसह संपूर्ण भू-भागात जी काही आरक्षणे टाकण्यात आली आहेत. त्या आरक्षणांची माहिती कोडींग स्वरुपांत वेबसाईटवर उपलब्ध होत आहे. मात्र या कोडवर्डचा अर्थ कळत नाही. आरक्षणाबाबत पारदर्शकता असली पाहिजे. आरक्षण कोणते, कशासाठी का टाकले गेले, याचेही स्पष्टीकरण मिळाले पाहीजे, असेही खा. उदयनराजेंनी पत्रकात म्हटले आहे.