सातारा : राज्याचे माजी सहकार मंत्री स्व. विलासराव पाटील-उंडाळकर यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील-उंडाळकर हे लवकरच काँग्रेसला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात दाखल होण्याची चिन्हे आहेत. मुंबईत मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदआबा पाटील यांच्या साक्षीने सह्याद्री गेस्ट हाऊसवर अजितदादा पवार व उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्यात गोपनीय खलबते झाली.
स्व. विलासराव पाटील उंडाळकर यांनी प्रदीर्घ काळ सातारा जिल्ह्याचे नेतृत्व केले. एकेकाळी ‘काका बोले जिल्हा हाले’अशी म्हण सातारा जिल्ह्यात रूढ झाली होती. एवढा दबदबा विलासकाका उंडाळकरांचा सातारा जिल्ह्यात होता. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेवरही विलासकाकांचा एकछत्री अंमल होता. मात्र, कालांतराने विलासकाकांच्या सत्तेला सर्वत्र सुरूंग लागले गेले. शिवाय त्यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्याही राजकारणाला उभारी येताना दिसली नाही. विलासकाकांच्या मृत्यूनंतर उदयसिंह पाटील यांनी काका गटाची धुरा हातात घेतली. गावोगावी जनसंपर्क वाढवला. राष्ट्रीय काँग्रेसचा विचार पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशीही मिळतेजुळते घेतले. मात्र, तरीही अपेक्षित यश उदयसिंह पाटील उंडाळकर यांना मिळताना दिसत नाही. त्यातच सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. राज्यातही काँग्रेस अथवा महाविकास आघाडीची सत्ता आली नाही. त्यामुळे उदयसिंह पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
विलासकाका उंडाळकर व लक्ष्मणराव पाटील यांची मैत्री सर्वश्रुत होती. काका-तात्या या जोडगोळीने एकेकाळी जिल्हा गाजवला होता. विलासकाकांच्या संकटाच्या काळात लक्ष्मणराव पाटील त्यांच्यासाठी धावून गेले होते. हाच मैत्रीचा अध्याय पुढच्या पिढीनेही जोपासण्याचा निर्णय घेतला असल्याच्या घटना घडताना दिसत आहेत. दोन दिवसांपूर्वीच मुंबईत सह्याद्री गेस्ट हाऊसवर राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार आणि उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदआबा पाटील, खा. नितीनकाका पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर उपस्थित होते. या बैठकीत उदयसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये यावे या अनुषंगाने चर्चा झाली. काँग्रेसची जी यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा आहे तीच विचारधारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची असल्याने तुम्हाला अडचण येणार नाही, असेही उदयसिंहांना सांगण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुमचा पूर्ण सन्मान राखला जाईल. तुम्ही तातडीने निर्णय घ्या, असे अजितदादांनी उदयसिंहांना सांगितले. त्यावर कराडला गेल्यानंतर माझ्या सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून मी निर्णय घेईन, असे उदयसिंहांनी सांगितले. बैठकीत विलासकाकांच्या नेतृत्वाविषयी, त्यांच्या सातारा जिल्ह्यावर असलेल्या प्रभावाविषयी चर्चा झाली.
या घडामोडींमुळे कराड दक्षिणेतील वातावरण ढवळून निघाले असून उदयसिंह पाटील उंडाळकर कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या राजकिय भवितव्याचा विचार करत लवकरच अजितदादा पवार गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उदयसिंह पाटील-उंडाळकर नेमकी काय भूमिका घेतात? याकडे सातारा जिल्ह्याचे लक्ष आहे.