सातारा: खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजेयांच्यात सोनगाव येथील फार्महाऊसवर सोमवारी गुप्त बैठक पार पडली. या बैठकीला राजू भोसले तसेच सुनील काटकर हेही उपस्थित होते. यामध्ये गट व गणनिहाय जागा वाटपावर प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, उमेदवारीबाबत कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही. ही बैठक केवळ प्राथमिक चर्चा ठरली आणि अंतिम निर्णयासाठी दोन्ही राजे मंगळवारी पुन्हा एकत्र येणार असल्याचे समजते.
जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक जाहीर झाल्यापासून सातारा व जावली तालुक्यातील उमेदवारीबाबत चर्चा सुरू झाली आहे. सातारा तालुक्यात दोन्ही राजेंमध्ये जागा वाटपाचा नेमका काय फॉर्म्युला राहणार याचीही उत्सुकता आहे. पक्षीय पातळीवर भाजपच्या बैठका होत असताना दोन्ही राजेंकडून तालुक्यातील जागा वाटपाबाबत बैठक किंवा चर्चा होत नसल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता वाढली होती. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी सोनगाव येथे बैठक पार पडली. त्यामध्ये प्राथमिक चर्चा झाली. मात्र ठाम निर्णयापर्यंत बैठक पोहोचली नाही. त्यामुळे मंगळवारी पुन्हा बैठक होणार आहे.
राजकीय वर्तुळात दोन्ही राजेंकडून सध्या 50-50 टक्के जागा वाटपाचा फॉर्म्युला चर्चेत आहे. दोन्ही राजेंचे मनोमीलन लक्षात घेता गट व गणांमध्ये समसमान जागा वाटप होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र लगतच्या कोरेगाव व कराड उत्तरच्या लोकप्रतिनिधींचा विश्वासात घेतले जाणार का? याबाबत उत्सुकता आहे. त्यामुळे 50-50 चे सूत्र प्रत्यक्षात कितपत व्यवहार्य ठरेल, याविषयी साशंकता आहे. काही गटांमध्ये राजेंचा प्रभाव अधिक असल्याने तिथे समसमान वाटप न करता कमी-जास्त जागा सोडल्या जातील का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.