सातारा : सातारा पालिका निवडणुकीत उमेदवारांनी केलेले काम, लोकसंपर्क आदी बाबींचा विचार करून संधी दिली जाईल. जिल्हा परिषद, पंचायत समितीसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतर निवडणुकांबाबतही याच सूत्राचा वापर केला जाईल, अशी माहिती खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, जवळचा-लांबचा करत राहिलो आणि पक्षाचे प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिली नाही, तर आपलीही काँग्रेस होईल, असा धोकाही त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा शासकीय विश्रामगृहावर झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद झाली. यावेळी खा. उदयनराजे म्हणाले, निवडणुकीत संधी कोणत्या व्यक्तीला द्यायची हा महत्त्वाचा विषय असतो. पुनर्रचनेनंतर बरेच विधानसभा मतदारसंघ ओव्हरलॅप झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक विद्यमान आमदारांना जवळच्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी, असे वाटते. मात्र, असं न करता ज्याचे काम चांगले त्याला त्याच्या कामाची पोचपावती मिळाली पाहिजे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हेच सूत्र अवलंबले पाहिजे. काँग्रेसने हे सूत्र न सांभाळल्याने सातारा हा काँग्रेसचा असलेला बालेकिल्ला संपुष्टात आला.
त्यामुळे जवळचा आणि लांबचा असा भेद करण्यापेक्षा ज्याचे काम चांगले आहे, जो लोकांपर्यंत पोहोचला आहे, त्याला निवडणुकीत संधी मिळाली पाहिजे. दगडाला शेंदूर फासला, तरी लोक मतदान करतील, असे एकेकाळी बोलले जायचे. मात्र, आता तसे होत नाही. त्या काळात काँग्रेसने काम करणाऱ्या लोकांना संधी दिली नाही. त्यामुळे भाजपमध्ये काम करणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणात संधी उलपब्ध झाली. मी कुणाच्याही बाजूने न बोलता वस्तुस्थिती सांगत आहे. पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी देण्यावर सर्वांचे एकमत झाले. आमदार, खासदार होण्याची प्रत्येकाच्या मनात अभिलाषा असते, असेही खा. उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
युवा कार्यकर्ते सामाजिक काम करत असताना त्यांना सातारा पालिका निवडणुकीत संधी देणार का? असे विचारले असता खा. उदयनराजे भोसले म्हणाले, या निवडणुकीसाठी बरेचजण इच्छुक आहेत. सामाजिक काम, त्यांचे योगदान विचारात घेऊन संधी देणार असल्याचे खा. उदयनराजे यांनी सांगितले. सातारा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांचे काम चांगले असल्याचेही त्यांनी सांगितले.