सातारा : भाजपचे हेवीवेट नेते खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यातील यारी पुन्हा एकदा जिल्हा शासकीय विश्रामगृहावर दिसली. जयकुमार गोरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उदयनराजेंनी त्यांना ‘पार्टी कुठे?’ असा मिश्कील सवाल करताच चला जलमंदिरलाच जाऊन पार्टी करू, असे मिश्कील उत्तर जयकुमार गोरे यांनी दिले. यानिमित्ताने पुन्हा एकदा उदयनराजे व जयकुमार गोरे यांच्यातील सुसंवाद सुरू झाल्याचे चित्र दिसले.
सातारा लोकसभेच्या निवडणुकीत तत्कालिन जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांचे नाव अचानकपणे खासदारकीसाठी भाजपमधून येऊ लागल्यानंतर खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व ना. जयकुमार गोरे यांच्यामध्ये सुप्त नाराजीचे वातावरण तयार झाले होते. मात्र, दोघेही कधीच एकमेकांविरोधात बोलले नाहीत. बऱ्याच कालावधीनंतर खा. उदयनराजे भोसले व ना. जयकुमार गोरे भाजप पक्षाच्या व्यासपीठावर एकत्र आले.
जिल्हा परिषद, पंचायत समित्या निवडणुकांमध्ये भाजपला जास्तीत जास्त जागा मिळवून भाजपची सर्वत्र सत्ता आणण्याचा निर्धार भाजपच्या बैठकीत करण्यात आला. या बैठकीला खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, ना. शिवेंद्रराजे भोसले, ना. जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुल भोसले, आ. मनोजदादा घोरपडे उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर सर्वजण एकत्र बाहेर आले. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी जयकुमार गोरे यांच्या खांद्यावर हात टाकत वाढदिवसाची पार्टी कुठे? असा मिश्कील सवाल केला. गोरे यांना त्यांनी चिमटेही काढले. जयकुमार गोरे यांनीही मिश्कीलपणे उत्तर देत चला असेच जलमंदिरवर जाऊन पार्टी करू, असे सांगितले.
दोघांमध्येही बऱ्याच कालावधीनंतर सुसंवाद रंगला. विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे ना. निंबाळकर यांच्याशी संघर्ष असताना उदयनराजे भोसले, जयकुमार गोरे व रणजित निंबाळकर कायम एकत्र असायचे. मात्र, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत उदयनराजे व रामराजे ना. निंबाळकर यांच्यात समेट झाल्यानंतर हे त्रिकुट काहीसे वेगळे झाले होते. भाजपच्या बैठकीच्या निमित्ताने उदयनराजे-गोरेंमधला दुरावा पुन्हा एकदा मिटल्याचे चित्र दिसले.