सातारा : जिल्हा परिषद इमारतीपेक्षा सातारा पालिकेची इमारत भव्य दिव्य दिसते. या इमारतीस जागा उपलब्ध व्हावी, यासाठी उपनगराध्यक्ष अॅड. डी. जी. बनकर व त्यावेळच्या नगरसेवकांनी पाठपुरावा केला. सातार्याचे सुपुत्र व उद्योजक बाबा कल्याणी यांनी नाममात्र एक रूपयात जागा दिल्याने ही इमारत पूर्णत्वास जात आहे. नगरपालिकेची ही इमारत सातार्याच्या वैभवात भर टाकेल. स्वच्छता, पाणीपुरवठा, घरकूल आदि सातारकरांना दिलेली वचने पूर्ण केली, असे भावोद्गार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत काढले.
सातारा पालिकेच्या प्रशासकीय इमारतीची पाहणी खा. उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी दुपारी केली. यावेळी उपनगराध्यक्ष अॅड. डी. जी. बनकर, झेडपीचे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, शहर नियोजन सभापती अशोक शेडगे, महिला बालकल्याण समिती सभापती मोनिका घोरपडे, नगरसेवक मनोज शेंडे, निशांत पाटील, पंकज चव्हाण, नगरसेविका सावित्री बडेकर, अॅड. विनीत पाटील, पाणीपुरवठा अभियंता शहाजी वठारे आदि प्रमुख उपस्थित होते.
खा. उदयनराजे भोसले म्हणाले, सध्याची सातारा पालिकेची असलेली जुनी इमारत कार्यालयीन कामकाजासाठी अपुरी आहे. नागरिकांचीही गैरसोय होत होती. प्रशासकीय इमातीसाठी जागा शोधत असताना नव्या इमारतीसाठी नवी जागा बाबा कल्याणी यांची मिळाली. जागा खरेदी करण्यासाठी पैसे कसे उभारायचे, असा प्रश्न मनात निर्माण झाला.
मात्र बाबा कल्याणी यांच्याशी चर्चा करताना ते म्हणाले, इतक्या छोट्या गोष्टीसाठी एवढ्या लांब तुम्ही आलात. त्यांना जागेची किंमत विचारली तर त्यांनी जागा तुम्हाला दिली. उद्या खरेदीपत्र करून टाका. जागेच्या मोबदल्यात मला एकही रुपया नको, असे सांगून त्यांनी मोठेपणा दाखवला. ते सातार्याचे सुपुत्र असून त्यांच्या कारभाराचा जगभर विस्तार होत आहे. उद्योग सुरु करण्यात त्यांच्या वडिलांचे मोठे योगदान राहिले. त्यांच्या वडिलांचे स्मारक व्हावे, ही बाबा कल्याणी यांची इच्छा आहे. इमारतीचे बांधकाम पूर्ण होताच बाबा कल्याणी यांच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.