सातारा

Ambenali Ghat Accident: घाबरेगुबरे जीव बिलगले उदयनराजेंना

मृतांच्या कुटुंबीयांना धीर; दाटून आला गहिवर

पुढारी वृत्तसेवा

सातारा : तरण्या बांड पोरांच्या मृत्यूनंतर घरात कोसळलेल्या आस्मानी संकटांना सावरण्यासाठी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले थेट मर्ढे येथे जाऊन पोहोचले. या संकटाने भेदरलेले आणि हातपाय गळालेले घाबरेगुबरे जीव उदयनराजेंना पाहताच त्यांना जाऊन बिलगले. उदयनराजेंनी या मुलांना छातीशी कवटाळत मायेचा धीर दिला. उदयनराजेंमधला पहाडासारखा माणूसही कमालीचा संवेदनशील झाल्याचे पाहायला मिळाले. मर्ढे, आसगाव व खटाव या तीनही गावांमध्ये जाऊन उदयनराजेंनी तरुणांच्या कुटुंबीयांना आधार दिला.

आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातात स्कॉर्पिओ दरीत कोसळून 8 तरुणांचा दुर्देवी मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. या तरुणांच्या घरी जाऊन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले. या अपघातात आदित्य साळुंखे, महेश पवार, रितेश लोखंडे, सुहास लोखंडे, अंश चव्हाण, निखिल शिंगटे, उत्कर्ष शिंगटे, संदीप काटकर यांचा मृत्यू झाला. या दु:खद प्रसंगी खा. उदयनराजे यांनी तीव्र शब्दांत शोक व्यक्त करत त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला.

मी त्यांच्या मुलाची किंवा भावाची जागा कधीच भरून काढू शकत नाही, पण मुलगा आणि भाऊ या नात्याने सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन, अशी भावना खा. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली. यावेळी जिल्हा परिषद शिक्षण समितीचे माजी सभापती सुनील काटकर आदि उपस्थित होते.

उदयनराजेंनी मर्ढे, आसगाव व खटाव येथे जाऊन तीनही कुटुंबीयांना भेटी दिल्या. उदयनराजेंना पाहताच या कुटुंबांच्या जीवात कालवाकालव झाली. उदयनराजेंनी तीनही कुटुंबांना धीर देताना त्यांच्या कुटुंबातील छोट्या मुलांना छातीशी कवटाळले. ‌‘मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे‌’ हे उदयनराजेंचे बोल या कुटुंबीयांना धीर देऊन गेले. उदयनराजेंचा हा संवेदनशील स्वभाव पुन्हा एकदा सातारा जिल्ह्याच्या जनतेसमोर आला. संकटाच्या काळात उदयनराजेंनी असेच गोरगरीब जनतेच्या पाठीशी उभे राहावे, अशा प्रतिक्रिया सातारा जिल्हावासीयांमधून उमटत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT