सातारा

Udayanraje Bhosale | शिवरायांच्या विचारानुसार नरेंद्र मोदी यांचे देशात काम : खा. उदयनराजे

छत्रपती शिवाजी महाराज यांचाच विचार घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंतन, मनन केले आणि ते विचार आचरणात आणले, असे प्रतिपादन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले.

पुढारी वृत्तसेवा

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार तळागाळात लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम भारतीय जनता पक्षाने केले. सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून शिवाजी महाराजांनी स्वराजाची स्थापना केली. सर्वसामान्यांच्या हितासाठी ते लढले. रयतेचा उत्कृर्ष व उन्नतीसाठी ते सतत प्रयत्नशील राहिले. छत्रपती शिवाजी महाराज यांचाच विचार घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंतन, मनन केले आणि ते विचार आचरणात आणले, असे प्रतिपादन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले.

सातार्‍यातील शाहू कला मंदिर येथे विकसित भारत संकल्प सभा संपन्न झाली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले, जि. प. उपाध्यक्ष राजूभैय्‍या भोसले, नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष अ‍ॅड. डी. जी. बनकर, भाजपचे गटनेते अविनाश कदम, लोकसभा समन्वयक सुनील काटकर, भाजपचे जिल्हा जिल्हा सरचिटणीस विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार व मनीषा पांडे, विधानसभा प्रमुख अविनाश कदम, उपाध्यक्ष व सभापती धनंजय जांभळे आदि प्रमुख उपस्थित होते.

खा. उदयनराजे भोसले म्हणाले, छत्रपतींचा विचार घेऊन देशात आणि राज्यात भाजपा काम करत आहे. यापूर्वी देशात व राज्यात ज्यांच्याकडे सत्ता होती त्या पक्षांकडून हे कधी घडले नाही. त्यांना कुणी थांबवले होते का? त्यांना माहित नव्हते का? हे सगळं अंत:करणातून आले तरच त्याचे वस्तुस्थितीत रूपांतर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट होते तेव्हा ते आवर्जून विचारपूस करतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावलावर पाऊल टाकून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे पदाधिकारी वाटचाल करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे कुशल व दूरदृष्टी असणारे व्यक्तिमत्व देशाला लाभले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास गतीने होत आहे. सामान्य कुटुंबात जन्माला येऊन नरेंद्र मोदी यांनी अद्वितीय कामगिरी केली. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. तरूणांनी याचा विचार करायला हवा. जिद्द उराशी बाळगली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे तुम्हीही विश्‍व निर्माण करू शकता, असा विश्वास खा. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.

सूत्रसंचालन व आभार विकास गोसावी यांनी मानले. दरम्यान, भाजप पदाधिकार्‍यांनी शाहू कलामंदिर ते जलमंदिर अशी पदयात्रा काढण्यात आली. यावेळी भारत माता की जय, नरेंद्र मोदी आगे बढो, हम तुम्हारे साथ है, देवेंद्र फडणवीस आगे बढो, हम तुम्हारे साथ है, वंदे मातरम्, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, उदयनराजे यांचा विजय असो, शिवेंद्रराजे यांचा विजय असो, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT