सातारा : सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार आहे. येत्या १५ दिवसांत प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरु होत आहे. आजपर्यंत दिग्गजांच्या नेतृत्वाखाली डीसीसी बॅंक ही राजकारण विरहित शेतकरी-सभासद केंद्रबिंदू मानून वाटचाल करत आहे.
सातारा डीसीसी बँक ही देशात एक आदर्श बॅंक म्हणून नाबार्डसह अनेक पातळयांवर नावाजली गेली आहे. या पार्श्वभुमीवर शेतकरी-सभासद, ठेवीदार,कर्जदार व कर्मचारी हितासाठी ही संचालक निवडणूक वैयक्तिक किंवा पक्षीय राजकारण विरहीत करण्यासाठी संबंधितांनी योगदान द्यावे, असे आवाहन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
सातारा जिल्हा बॅंकेची निवडणूक नजीकच्या काळात होवू घातली आहे. सातारा जिल्हा बॅंकेचे नेतृत्व करताना अनेक दिग्गजांनी राजकारणाचे जोडे बाजुला ठेवून जिल्हा बॅंकेचे व्यवस्थापन पाहिलेले आहे. सेवक वर्गानेही आपले योगदान बॅंकेच्या प्रगतीकरीता दिले आहे. त्यामुळेच सातारा जिल्हा बॅंक शेतकर्यांची अर्थवाहिनी ठरली आहे. शेतकरी हिताला प्राधान्य देत उच्च दर्जाची बॅंकींग सेवा बॅंकेच्या ३१७ शाखांच्या माध्यमातून दिली जात आहे. ६७ एटीएम, २ विस्तारीत शाखा, ६५० मायक्रो एटीएम, ऑनलाईन सुविधा बॅंकेने पुरवून शेतकरी-खातेदार, ठेवीदार यांच्या गरजेला सहकार्यांचा हात देत, त्यांच्या आर्थिक जीवनाला एक आयाम दिला आहे.
सातारा जिल्हा बॅंकेने आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळवले आहेत. इतकेच नव्हे तर बँकेचा सतत १९ वर्षे निव्वळ एन.पी.ए सातत्याने झिरो परसेंट राहिलेला आहे. बॅंकेची कर्ज वसुली ९५ टक्क्यांहून अधिक आहे. राज्यातील ३१ जिल्हा मध्यवर्ती बँकापैकी बऱ्याचशा सहकारी बँकांमध्ये राजकारण शिरल्यावर एक तर त्या बॅंका नावालाच उरल्या किंवा त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची उदाहरणे आहेत, असे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले म्हणाले.