सातारा

Udayanraje Bhosale Ajinkyatara chairman|'अजिंक्यतारा'च्या चेअरमन खुर्चीवर उदयनराजे विराजमान

'अजिंक्यतारा'च्या चेअरमन खुर्चीवर उदयनराजे विराजमान, शिवेंद्रराजेंच्या आग्रहातून उमटला हळव्या बंधुप्रेमाचा भाव

पुढारी वृत्तसेवा

सातारा : राजकारणात पदे, प्रतिष्ठा, अधिकार आणि जबाबदाऱ्यांना अनन्यसाधारण महत्त्व असते. मात्र, या सगळ्यांपलीकडे रक्ताच्या नात्यांत जपलेली आपुलकी, आदर आणि प्रेम यांचे मोल काही वेगळेच असते. एखाद्या मोठ्या सोहळ्यापेक्षा कधी-कधी एखादा छोटासा प्रसंगही नात्यांमधील भावबंधांची ताकद अधोरेखित करतो. असाच एक हळवा आणि भावनिक क्षण अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर अनुभवायला मिळाला. धाकटे बंधू, राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या आग्रहाखातर खा. श्री. छ. उदयनराजे भोसले हे थेट कारखान्याच्या चेअरमनच्या खुर्चीवर विराजमान झाले. या प्रसंगातून दोन्ही राजेंमधील बंधुप्रेमाची भावस्पर्शी झलक पाहायला मिळाली.

खा. उदयनराजेंनी प्रथमच अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याला भेट दिली. यावेळी कारखान्याच्या संचालक मंडळाच्या सभागृहात घडलेला एक प्रसंग उपस्थितांसाठी विशेष लक्षवेधी ठरला. कारखान्याचे नेतृत्व करणारे ना. शिवेंद्रराजे यांनी आपल्या मोठ्या भावाला चेअरमनच्या खुर्चीवर बसण्याचा आग्रह केला. हा आग्रह केवळ औपचारिकतेपुरता मर्यादित नव्हता, तर त्यामागे मोठ्या भावाविषयीचा आदर आणि मनातील जिव्हाळ्याची भावना असल्याचे या प्रसंगातून जाणवले. धाकट्या भावाने प्रेमाने केलेला आग्रह मोठ्या भावानेही तितक्याच आपुलकीने स्वीकारला.

खुर्चीपेक्षा मोठा ठरला भावनेचा मान !

अजिंक्यतारा कारखान्याच्या चेअरमनची खुर्ची ही केवळ पदाचे प्रतीक नाही, तर सहकार क्षेत्रातील नेतृत्व, कष्ट आणि जबाबदारीचेही प्रतीक आहे. अशा महत्त्वाच्या खुर्चीवर आपल्या मोठ्या भावाला बसण्याचा आग्रह शिवेंद्रराजे यांनी धरणे, ही बाब या भेटीचे वेगळेपण अधोरेखित करणारी ठरली. राजकारणात प्रत्येक कृतीकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते; मात्र, या प्रसंगाकडे पाहताना भावांमधील आपुलकी आणि परस्परांविषयीचा आदर अधिक ठळकपणे जाणवला.

उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. एका बाजूला कारखान्याच्या अध्यक्षपदाची प्रतिष्ठा, तर दुसऱ्या बाजूला त्या खुर्चीवर मोठ्या भावाला बसवण्यासाठी धाकट्या भावाने केलेला आग्रह, यामध्ये नात्यातील भावनिक ओलावा अनुभवायला मिळाला.

राजकीय जबाबदाऱ्यांपलीकडील नात्याची वीण

उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले हे दोघेही सार्वजनिक जीवनात आपापल्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. राजकारणातील व्यस्त दिनक्रम, सार्वजनिक कार्यक्रम आणि विविध जबाबदाऱ्यांच्या गर्दीत नात्यांमधील जिव्हाळा जपणे महत्त्वाचे असते. अशा वेळी एखाद्या सहज घडलेल्या प्रसंगातून व्यक्त होणारी आपुलकी अधिक बोलकी ठरते. चेअरमनच्या खुर्चीवर उदयनराजे विराजमान होण्याचा हा प्रसंग केवळ एका भेटीपुरता मर्यादित राहिला नाही, तर दोन्ही भावांमधील नात्याच्या भावनिक पैलूची चर्चा घडवून आणणारा ठरला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT