खा. उदयनराजे भोसले.  Pudhari File Photo
सातारा

Udayanraje Bhosale | कोयना विद्युत प्रकल्पासाठी 862 कोटींची ‘सुप्रमा’ : खा. उदयनराजे भोसले

जिल्ह्याच्या कृषी व औद्योगिक विकासाला बळ

पुढारी वृत्तसेवा

सातारा : कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृह प्रकल्पासाठी तब्बल 862 कोटी 29 लाख रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे कोयना प्रकल्पाच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ होणार आहे. परिणामी सातारा जिल्ह्याच्या कृषी व औगिद्योगिक विकासाला चालना मिळणार असून त्याचे राज्याच्या ऊर्जा सुरक्षेवर सकारात्मक परिणाम होणार आहेत.

खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी घेतलेली आक्रमक भूमिका, सातत्यपूर्ण पाठपुरावा व धोरणात्मक प्रयत्न हे अखेर निर्णायक ठरले. राज्य शासनाच्या विविध पातळींवरील चर्चांमध्ये त्यांनी कोयना प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले होते. राज्याच्या ऊर्जा विभागाने आणि जलसंपदा विभागाने या प्रकल्पाची संभाव्य उपयोगिता लक्षात घेऊन सुधारित आराखड्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि अखेर मंत्रिमंडळ बैठकीत तो मंजूर करण्यात आला.

कोयना धरण हे सातारा जिल्ह्यातील ऊर्जा, सिंचन व जलव्यवस्थापनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे धरण आहे. या धरणाच्या पायथ्याशी असलेल्या पायथा विद्युतगृहातून जलविद्युत (हाड्रोलिक) वीज निर्मिती केली जाते. हा प्रकल्प अनेक वर्षांपासून कार्यरत असून राज्याच्या वीज निर्मितीत त्याचा मोठा वाटा आहे. मात्र, गेल्या काही दशकांतील तांत्रिक बदल व सततच्या वापरामुळे या प्रकल्पाच्या काही भागांची कार्यक्षमता कमी झाल्याने त्याचे आधुनिकीकरण करणे अत्यावश्यक बनले होते. हीच गरज ओळखून खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी हा मुद्दा केंद्र व राज्य शासनाकडे सातत्याने मांडला.

862 कोटी 29 लाखाच्या या निधीतून कोयना पायथा विद्युत प्रकल्पाच्या विकासावर खर्च करण्यात येणार आहे. नवी व उच्च कार्यक्षम उपकरणे बसवल्याने ऊर्जा निर्मितीत वाढ होणार आहे. सुरक्षा व संरचनात्मक मजबुतीकरण, पर्यावरणपूरक उपाययोजना व जलसाठा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने सुधारणा, संभाव्य आपत्कालीन परिस्थितीत जलप्रवाह व वीजनियंत्रणासाठी तंत्रज्ञान अद्ययावत करणे महत्त्वाचे आहे. कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहाच्या विकासामुळे केवळ ऊर्जा निर्मितीच नव्हे तर शाश्वत विकासाच्याद़ृष्टीने एक मोठे पाऊल टाकले जाणार आहे.

खा. उदयनराजे भोसले हे सातारा जिल्ह्याच्या प्रश्नांवर नेहमीच आक्रमकपणे भूमिका घेणारे खासदार आहेत. कोयना प्रकल्पाच्या बाबतीत त्यांनी केलेली संशोधनाधारित मांडणी, वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा तसेच मंत्रालयामध्ये तांत्रिक व आर्थिक बाबींची उकल करुन दिली. त्यांनी सातत्याने या विषयावर लक्ष केंद्रित करुन अखेर ही मान्यता मिळवली. या निर्णयामुळे सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या ऊर्जाक्षेत्राला भक्कम बळ मिळणार आहे.

सातार्‍याच्या विकासाची नवी दिशा

कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृह प्रकल्पामुळे राज्याच्या हरित विकास धोरणात महत्त्वाचा टप्पा पार पाडला जाणार आहे. तसेच हा प्रकल्प शाश्वत विकासाचा आदर्श ठरु शकतो. कोयना पायथा विद्युत प्रकल्पाला मिळालेली सुधारित प्रशासकीय मान्यता ही सातार्‍याच्या विकासाची नवी दिशा ठरु शकते. हे यश सातत्याने जनहितासाठी कार्यरत असलेल्या लोकप्रतिनिधींच्या दूरद़ृष्टीचे प्रत्यक्ष उदाहरण ठरणारे आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत सातरा लोकसभा मतदारसंघातील कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहाच्या प्रकल्पासाठी 862 कोटी 29 लाख रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. त्याबद्दल राज्य शासनाचे सातारा जिल्हावासीयांच्या वतीने मन:पूर्वक आभार मानतो. कोयना हा प्रकल्प महाराष्ट्राच्या हृदयातील आहे. राज्य शासनाने हा निधी वीज प्रकल्पासाठी मंजूर केला असला तरी त्यामध्ये सातार्‍याच्या उज्ज्वल भविष्याची बीजे आहेत.
- खा. श्री. छ. उदयनराजे भोसले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT