खा. उदयनराजे भोसले.  Pudhari File Photo
सातारा

Satara politics | प्रसंगी 29 नगरसेवक घेऊन विरोधात बसा : उदयनराजे

मनोमिलनात ठिणगी

पुढारी वृत्तसेवा

सातारा : पालिकेच्या सभेत उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर आणि सभापती बाळासाहेब खंदारे यांच्यात झालेल्या खडाजंगीनंतर सातारा विकास आघाडीचे नेते खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी जलमंदिरात बैठक घेतली. पालिकेत मनोमिलन तुटले तरी चालेल; पण अपमान करून घेण्यापेक्षा 29 नगरसेवक सोबत घेऊन विरोधी बाकावर बसा. कुणाची दंडेलशाही खपवून घेऊ नका, अशा शब्दांत उदयनराजेंनी आक्रमक पवित्रा घेतला. या संदर्भात प्रसंगी 15 मे रोजी मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार केली जाणार असल्याचे समजते.

सभेत उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर यांना बांधकाम सभापती बाळासाहेब खंदारे यांनी टार्गेट करत पाणउतारा केला. सभेत घडलेला प्रकार व्हिडीओसह सातारा विकास आघाडीचे पदाधिकारी व नगरसेवकांनी जलमंदिर येथे उदयनराजे यांची भेट घेऊन सांगितला. यावेळी बैठकीत उदयनराजे यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत पदाधिकारी व नगरसेवकांना सूचना केल्या.

सभागृहात अपमान होत असताना सभात्याग का केला नाही? कुणाची हुकूमशाही खपवून घेऊ नका. वेळ पडल्यास विरोधात बसा. पदाधिकाऱ्यांना कसेही बोलायला मोगलाई लागली का? त्यांना बाळू खंदारेला आवर घालता येत नाही का? मनोमिलन तुटले तरी चालेल. अपमान करून घेण्यापेक्षा विरोधात बसा. बाळू खंदारेनी पदाधिकाऱ्यांची सभागृहात जाहीर माफी न मागितल्यास पुढील भूमिका ठरवावी लागेल, अशा इशारा खा. उदयनराजेंनी दिला.

यावेळी मनोज शेंडे यांच्यासह पक्षप्रतोद निशांत पाटील, शहर नियोजन सभापती अशोक शेडगे, महिला व बालकल्याण समिती सभापती मोनिका घोरपडे, नगरसेवक पंकज चव्हाण, तसेच साविआचे नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या. दरम्यान, गुरुवारी जलमंदिर येथे पुन्हा साविआची बैठक होण्याची शक्यता असून, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या दौऱ्यात कोणती भूमिका घ्यायची, यावर चर्चा होणार असल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT