सातारा

सातारा : प्रांत कार्यालयातील दोन लाचखोर कर्मचारी गजाआड

Arun Patil

कराड, पुढारी वृत्तसेवा : टेंभू उपसा जलसिंचन प्रकल्पात गेलेल्या जमिनींचे मूल्यांकन करून देण्यासाठी शेतकर्‍यांकडून वीस हजारांची लाच स्वीकारणार्‍या कराडच्या उपविभागीय कार्यालयातील दोघा कंत्राटी कर्मचार्‍यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रंगेहात पकडले.

दिनकर रामचंद्र ठोंबरे (वय 70) आणि रामचंद्र श्रीरंग पाटील (70) अशी दोघा लाचखोर कर्मचार्‍यांची नावे आहेत. दिनकर ठोंबरे हे कालवा निरीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. कराडच्या उपविभागीय कार्यालयात त्यांना वरिष्ठ सहायक भूसंपादन या पदावर कंत्राटी पद्धतीने नेमण्यात आले होते. तर रामचंद्र पाटील हे निवृत्त लिपिक असून त्यांना रेल्वे भूसंपादन लिपिक या पदावर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यात आली आहे.

या दोन्ही कर्मचार्‍यांविरोधात शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता संबंधित दोघा कर्मचार्‍यांनी शेतकर्‍यांकडे लाच मागितल्याचे समोर आले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या सूचनेनुसार पोलीस उपाधीक्षक श्रीमती उज्ज्वल वैद्य, पोलीस निरीक्षक विक्रम पवार यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी शुक्रवारी सापळा लावला होता.

येरवळे येथील नऊ शेतकर्‍यांकडून उपसा जलसिंचन प्रकल्पामुळे बाधित झालेल्या जमिनीच्या मूल्यांकनासाठी पाठपुरावा केला जात होता. हे मूल्यांकन करण्यासाठी दोन्ही लाचखोर कर्मचार्‍यांनी मागणी केल्याप्रमाणे वीस हजाराची रक्कम स्वीकारली आणि त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. याप्रकरणी लाचखोर कर्मचार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सायंकाळपर्यंत शहर पोलीस ठाण्यात सुरु होती. त्यामुळे याबाबतचा अधिक तपशील उपलब्ध होऊ शकला नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT