म्हसवड : विद्युत मोटारींच्या केबल चोरीतील दोघा संशयितांना म्हसवड पोलिसांनी अवघ्या 24 तासांत जेरबंद केले. संशयितांकडून थ्री फेज 1500 फूट केबल हस्तगत करण्यात आली आहे. संजय महादेव दडस (रा. मासाळवाडी, ता. माण, सध्या राहणार चादापुरी, ता. माळशिरस) व तुकाराम आप्पा लुबाळ (रा. मासाळवाडी, ता. माण) अशी संशयितांची नावे आहेत.
याबाबत म्हसवड पोलिस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवनाथ लुबाळ (रा. मासाळवाडी, म्हसवड, ता. माण), यांनी त्यांच्या शेतातील 1500 फूट लांबीची थ्री फेज केबल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार म्हसवड पोलिस ठाण्यात दाखल केली होती. या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही चालू असताना सपोनि अक्षय सोनवणे यांनी तपासादरम्यान सदर परिसराची पाहणी करून शोध मोहीम राबवली. या दोन्ही संशयितांना माळशिरस बाजूकडे पळून जाताना पेट्रोलिंग दरम्यान चोरलेल्या 1500 फूट केबलसह ताब्यात घेण्यात आले.
दोन्ही संशयितांना अवघ्या 24 तासात अटक करण्यात म्हसवड पोलिसांना यश आले. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसवड पोलीस ठाण्याचे सपोनि अक्षय सोनवणे, पोलिस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, शहाजी वाघमारे, नीता पळे, नवनाथ शिरकुळे, अभिजीत भादुले, महावीर कोकरे यांनी केली.