Satara milk adulteration 
सातारा

Satara Milk Adulteration: तुकाराम मुंढे, सातार्‍याकडे लक्ष द्याल का?समाजमनाची हाक

भेसळखोर दुधसम्राटांविरोधात उठाव

पुढारी वृत्तसेवा
आदेश खताळ

सातारा : अन्यायाविरोधात धडाडीने कारवाई करणारे, कायद्याला शरण न येणार्‍या भ्रष्टाचार्‍यांच्या मनात जरब निर्माण करणारे अन्न व औषध प्रशासनाचे राज्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून सातारा जिल्हावासीयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. जिल्ह्यात दूधासह अन्नपदार्थांमध्ये प्रचंड भेसळ होत असून आता कारवाया सुरू झाल्या आहेत. भेसळ रोखण्यासाठी तसेच निर्ढावलेल्या भेसळखोर दूधसम्राटांना दणका देण्यासाठी तुकाराम मुंढेसाहेब सातार्‍याकडे लक्ष द्याल का, अशी साद समाजमनाने घातली आहे.

दै. 'पुढारी'ने जवळपास महिनाभर 'पांढर्‍या दुधातील काळे बोके' या वृत्तमालिकेतून सातारा जिल्ह्यातील दूध भेसळीचे थैमान उघड केले. या वृत्तमालिकेने दूध संकलन केंद्र ते ग्राहकापर्यंत प्रत्येक टप्प्यावर होणारी भेसळ, बेकायदा चिलिंग सेंटर्स, बनावट अहवाल, बोगस नोंदी, काळा पैसा, विनापरवाना व्यवसाय हे सारे वास्तव जिल्ह्यासमोर आले. त्यामुळे भेसळखोर दूध माफियांविरोधात जिल्ह्यातून उठाव होऊ लागला आहे. जनता जागृत झाल्याने भेसळखोरीविरोधात दहापट तक्रारी वाढल्या.

मात्र, सातार्‍याला स्वतंत्र प्रयोगशाळा नाही, विभागाकडे वाहन नाही, मनुष्यबळाचा अभाव अशा अनेक समस्यांनी सातार्‍याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाला ग्रासले आहे. हा विभाग सक्षम होऊच नये, जणू असाच चंग भेसळखोरांनी बांधला आहे. मुंढेसाहेब, सातारा जिल्ह्यातील लाखो नागरिक, दूध पिणारी चिमुकली मुले, शुद्ध दुधासाठी अहोरात्र मेहनत करणारे दूध उत्पादक शेतकरी असा प्रत्येक घटक तुमच्याकडे आशेने पाहत आहे. सातारा जिल्ह्यात स्वतंत्र अन्न चाचणी प्रयोगशाळा, अन्न व औषध प्रशासन विभागाला आवश्यक साधने व भेसळखोरांविरोधात कठोर कारवाई हे तुमच्या एका निर्णयाने होऊ शकते. म्हणूनच तुकाराम मुंढेसाहेब सातारा जिल्हावासियांच्या हाकेला प्रतिसाद द्याल का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT