कराड : जळावू लाकडाची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या ट्रकवर वन विभागाने कारवाई करत ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ट्रकसह ट्रकमधील जळावू लाकूड जप्त केले आहे. विजयनगर (ता. कराड) येथील वन विभागाच्या तपासणी नाक्यावर वनपरिक्षेत्र अधिकारी ललिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
आबासो ज्ञानदेव पाटील (रा. येळगाव, ता. कराड) असे वन विभागाने गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जळावू लाकडाची बेकायदेशीर तोड करून त्याची कराड-चिपळूण मार्गावरून वाहतूक केली जात असल्याची माहिती कराडच्या वनपरिक्षेत्र अधिकारी ललिता पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सातारचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते व सहायक वनसंरक्षक जयश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार विजयनगर येथील वन विभागाच्या तपासणी नाक्यावर मंगळवार दिनांक दोन रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास विनापरवाना वृक्षतोड करून जळावू लाकूड ट्रकमध्ये भरून वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. त्यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले असून ट्रक व ट्रक मधील जळावू लाकूड जप्त केले आहे. वन विभागाने वन संरक्षण कायदा अंतर्गत ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे. उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहायक वनसंरक्षक जयश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी ललिता पाटील यांच्या सूचनेनुसार वनरक्षक शंकर राठोड, ललिता चव्हाण, उज्वला क्षीरसागर यांनी ही कारवाई केली आहे.