सातारा

Panchgani traffic jam: ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे वाहतूक कोंडी

पाचगणीत वाहनांच्या रांगा : पर्यटक 2 तास ताटकळले

पुढारी वृत्तसेवा

पाचगणी : शहरातील मुख्य रस्त्यावर सुरू असलेल्या कामादरम्यान ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे शुक्रवारी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. कोणतेही योग्य नियोजन न करता साईड पट्टी भरण्याचे काम सुरू केल्याने वाहनांच्या तब्बल दोन किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या.

संजीवन नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान वाहनांची मोठी गर्दी झाली. पर्यटकांच्या खासगी बस, चारचाकी वाहने आणि दुचाकी यामुळे संपूर्ण मार्गावर वाहतूक मंदावली. विशेषतः संजीवन नाका ते बेबी पॉईंट दरम्यान अरुंद रस्त्यामुळे समोरासमोर वाहने आल्यास वाहतूक पूर्णपणे ठप्प होत असल्याचे चित्र दिसून आले. दोन ते तीन तास अनेक वाहनचालकांना एकाच ठिकाणी अडकून राहावे लागले.

पर्यटकांची वाढती वर्दळ लक्षात न घेता मुख्य रस्ता बंद करून काम सुरू केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक वळवण्यासाठी कोणतीही ठोस व्यवस्था न केल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली.

पाचगणी परिसरातील या कोंडीमुळे रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवांच्या वाहनांनाही अडचणींचा सामना करावा लागला. पोलिसांनी वाहतूक नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला, मात्र अरुंद रस्त्यांमुळे परिस्थिती नियंत्रणात आणणे कठीण झाले. शेवटी काही वेळानंतर वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात आली, मात्र तोपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि प्रवाशांचा प्रचंड त्रास कायम राहिला. ठेकेदाराच्या निष्काळजी कारभारावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पर्यटन हंगामात अशा कामांसाठी योग्य नियोजन आणि नियंत्रण आवश्यक असल्याची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT