कास धरणावर भुशी डॅमचा फील घेण्‍यासाठी शनिवारी पर्यटकांनी तोबा गर्दी केली होती. (छाया : नीलेश शिंदे, बामणोली)  
सातारा

Satara Tourism : कास पर्यटकांनी बहरले; सांडव्यावर तोबा गर्दी

भुशी डॅमचा ‘फील’ घेण्यासाठी झुंबड; वाहतूक कोंडीने स्थानिक हैराण

पुढारी वृत्तसेवा

बामणोली : कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम बहरण्यास अवघे काही दिवस शिल्लक असतानाच कास परिसरात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. कास तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने सांडव्यावरून ओसंडून वाहणाऱ्या पाण्याला भुशी डॅमसदृश रूप आले आहे. त्यामुळे या पाण्यात भिजण्याचा मोह पर्यटकांना आवरत नसून शनिवारच्या सुट्टीच्या दिवशी कास परिसरात पर्यटकांची गर्दी झाली होती.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक कासकडे दाखल होत आहेत. सांडव्याच्या पाण्यात जाण्यास प्रशासनाने प्रतिबंध केला असून, पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. मात्र, काही पर्यटकांनी सुरक्षेसाठी लावण्यात आलेले गेट तोडून पाण्यात जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पर्यटकांना रोखताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. यावेळी काही पर्यटक आणि पोलिसांमध्ये बाचाबाचीही झाली.

सांडव्यावरून वेगाने वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असला, तरी त्या ठिकाणी जाणे धोकादायक ठरू शकते. प्रशासनाने पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. मात्र, काही पर्यटक नियम धाब्यावर बसवत पाण्यात जाण्याचा प्रयत्न करत असल्याने पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

कास परिसरातील वाढत्या पर्यटक संख्येबरोबरच वाहतूक कोंडीची समस्याही वाढली आहे. पर्यटकांच्या वाहनांच्या पार्किंगचे योग्य नियोजन नसल्याने कास तलावापासून पुढे कास-बामणोली मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. कासचे पर्यटन दिवसेंदिवस वाढत असताना प्रत्येक शनिवार-रविवारी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याने त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT