सातारा

Panchgani tourism: पर्यटकांनी पाचगणी बहरली

थंड वारा, घोडेसफारी अन्‌‍ निसर्गसौंदर्याची भुरळ

पुढारी वृत्तसेवा

पाचगणी : मे महिन्याचा अखेरचा विकेंड आणि शाळांच्या सुट्ट्यांचा शेवटचा टप्पा यामुळे प्रसिद्ध पर्यटनस्थळ पाचगणी आणि महाबळेश्वर येथे पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे. थंडगार वारा, आल्हाददायक वातावरण, निसर्गरम्य परिसर आणि धुक्याची हलकी चादर यामुळे पर्यटक अक्षरशः भारावून गेले असून संपूर्ण परिसर पर्यटनाच्या उत्साहाने फुलून गेला आहे.

मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली तसेच गुजरातमधूनही मोठ्या संख्येने पर्यटक पाचगणीत दाखल होत आहेत. शहरातील उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी अनेक कुटुंबांनी पाचगणीला पसंती दिली आहे. विशेषतः सकाळी आणि सायंकाळी वाहणारा थंड वारा पर्यटकांना सुखद अनुभव देत आहे. पाचगणीतील प्रसिद्ध टेबल लँड हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरत आहे. येथे घोडेसफारी आणि घोडागाडीचा आनंद घेण्यासाठी मोठी गर्दी होत असून विस्तीर्ण पठारावरुन निसर्गाचा आनंद लुटताना पर्यटक दिसत आहेत.

लहान मुलांपासून युवक-युवतींपर्यंत सर्वांनाच घोडेसफारीची विशेष भुरळ पडली असून सेल्फी आणि फोटोग्राफीचा मोहही अनेकांना आवरत नसल्याचे चित्र आहे. याशिवाय सिडनी पॉईंट, पारशी पॉईंट आणि भिलार येथील पुस्तकांचे गाव या पर्यटनस्थळांवरही पर्यटकांची मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे. हिरवाईने नटलेले डोंगर, दऱ्याखोऱ्यांचे विहंगम दृश्य, वातावरणातील गारवा आणि पुस्तकांच्या सहवासाचा अनुभव पर्यटकांना वेगळीच ऊर्जा देत आहे. पावसाळ्याची चाहूल लागत असल्याने परिसराचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक अर्थचक्रालाही चालना मिळाली आहे.

दरम्यान, वाढत्या गर्दीमुळे शहरातील काही भागांत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली असली तरी पोलिस प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. सुट्ट्यांच्या अखेरच्या टप्प्यात पाचगणीने पुन्हा एकदा पर्यटकांना मोहिनी घातली असून आगामी पावसाळ्यातही येथे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT