खटाव/दहिवडी : अवकाळी पावसाने गुरुवारी माण व खटाव तालुक्यांत थैमान घातले. माण तालुक्यातील तोंडले येथे वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर खटाव तालुक्यात पुसेगाव, खटाव, वडूजसह बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. अनेक ठिकाणी फळबागा, ज्वारी, कांदा पिकांसह चारा भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
माण तालुक्यातील तोंडले येथे शेतात काम करत असताना अंगावर वीज पडून एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. लाला दाजी जाधव (वय 65, रा. तोंडले, ता. माण) हे गुरुवारी सकाळी 7 च्या सुमारास बाशिंग शिवारातील शेतात गेले होते. त्यावेळी वादळी पावसात त्यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला.
खटाव तालुक्याच्या कलेढोण भागात बुधवारी मुसळधार पाऊस झाला होता. गुरुवारी दुपारी साडेतीननंतर तालुक्याचा उत्तर भाग वगळता बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली. पुसेगाव, खटाव, वडूज, जांब, जाखणगाव, लोणी, नागाचे कुमठे, गणेशवाडी, औंध, दरुज, दरजाई, वेटणे, भूषणगड परिसरात दमदार पाऊस झाला. जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे फळबागा, पिके आणि जनावरांच्या चाऱ्याचे नुकसान झाले. पुसेगाव, वडूजमध्ये रहदारीच्या रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.