Tomato Wastage | दराअभावी टोमॅटोचा ‘लाल’ चिखल  Pudhari Photo
सातारा

Tomato Wastage | दराअभावी टोमॅटोचा ‘लाल’ चिखल

उत्पादन खर्चही निघेना; ओझर्डे परिसरात शेतकर्‍यांनी थांबवली तोडणी

पुढारी वृत्तसेवा

वेळे : गेल्या वर्षी मिळालेल्या चांगल्या भावामुळे यंदा मोठ्या आशेने टोमॅटोची लागवड करणार्‍या ओझर्डे परिसरातील शेतकर्‍यांवर संकटाचा डोंगर कोसळला आहे. जानेवारी महिन्यापासून दरांमध्ये सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे उत्पादन खर्च तर दूर, तोडणीची मजुरीही निघत नसल्याने हवालदिल झालेल्या अनेक शेतकर्‍यांनी टोमॅटो तोडणीच थांबवली आहे.

ओझर्डे परिसरातील शेतकरी आपला माल विक्रीसाठी वाई, सातारा, पुणे आणि वाशी येथील बाजार समित्यांमध्ये पाठवतात. मात्र, सध्या सर्वच बाजारपेठांमध्ये टोमॅटोची आवक वाढल्याने दरांमध्ये मोठी घसरण झाली आहे. सध्या टोमॅटोला प्रतिकिलो अवघा सात ते आठ रुपये, म्हणजेच प्रति कॅरेट दीडशे ते दोनशे रुपये इतका कमी दर मिळत आहे. या तुटपुंज्या दरातून वाहतूक, मजुरी, आडत आणि हमालीचा खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी आर्थिक चक्रात अडकला आहे.

गेल्या वर्षी टोमॅटोला चांगला भाव मिळाल्याने यंदा अनेक शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली. एका एकरासाठी रोपे, मल्चिंग पेपर, खते, औषध फवारणी आणि मजुरी असा मिळून सुमारे दीड लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र, सध्याच्या दरात हा खर्च निघणेही अशक्य झाल्याने शेतकर्‍यांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. विक्री करणे परवडत नसल्याने अनेकांच्या शेतातील टोमॅटो झाडांवरच लाल होऊन गळून पडत आहेत, ज्यामुळे शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे आणि निराशेचे वातावरण आहे.

मागील वर्षी जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात टोमॅटोचे दर वाढले होते. टोमॅटोची राखण करण्यासाठी शेतकर्‍यांना शेतामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे लागले. त्यावेळी शेतकर्‍यांना लाखोंचा फायदा झाला. मात्र, यंदा जानेवारी महिन्यापासूनच अद्याप टोमॅटोला चांगला दर मिळाला नाही. त्यामुळे टोमॅटो फेकून देण्याची वेळ आली आहे.
मिलिंद खरात, शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT