सातारा : फडतरवाडी, ता. कोरेगाव येथील वनक्षेत्रात खैर झाडे तोडल्याप्रकरणी वनविभागाने तिघांना ताब्यात घेतले आहे. राहुल दुर्यधन गायकवाड (रा. विखळे), सुरज मिनानाथ अडागळे (रा. विखळे) व जयदीप मिनानाथ अडागळे अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. वन अधिकाऱ्यांनी मोटारसायकल, कटर मशिन व लाकुडफाटा ताब्यात घेतला आहे.
याप्रकरणी माहिती अशी फडतरवाडी येथील राखीव वनक्षेत्रात वृक्षतोड झाल्याची माहिती मिळाल्यानंतर वन अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा तीन संशयितंनी कटर मशिनने खैराची 29 झाडे तोडल्याचे आढळून आले. वनविभागाची टीम पोहोचताच हे तिघेही पळून जाण्याच्या तयारीत होते, पण ते वनविभागाच्या ताब्यात सापडले.
उपवनसंरक्षक अमोल सातपुते व सहायक वनसंरक्षक दिगंबर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रहार जगदाळे, वनपाल सुरेखा जगदाळे, वनरक्षक सुभाष बडदे, विजय नरळे, अजय कांबळे, रुपाली परदेशी, दीपक गायकवाड, चंद्रिका लोहार, राणबा बिक्कड, प्रतिक गायकवाड, सुनिल शेटे, किशोर ढाणे यांनी ही कारवाई केली. अधिक तपास सुरेखा जगदाळे करत आहेत.