Sahyadri Hills 
सातारा

Sahyadri Hills: ठोसेघर, चाळकेवाडीचा नूर पालटू लागला, पावसाच्या आगमनाने हिरवाईने नटला सह्याद्री

पर्यटकांची निसर्गभ्रमंती सुरू

पुढारी वृत्तसेवा

परळी : जुलैच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे सातारा तालुक्यातील ठोसेघर धबधबा पुन्हा एकदा फेसाळत कोसळू लागला आहे. हिरवाई, धुक्याची चादर आणि पावसाच्या सरींनी नटलेल्या परिसराने निसर्गप्रेमींना साद घातली असून ठोसेघरसह चाळकेवाडी परिसरात पर्यटकांची वर्दळ वाढू लागली आहे.

जून महिना संपत आला तरीही वरुणराजाची प्रतीक्षा कायम होती. अधूनमधून ढग दाटून येत असले तरी समाधानकारक पाऊस होत नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच निसर्गप्रेमींचीही निराशा होत होती. मात्र, जुलैच्या प्रारंभी झालेल्या दमदार पावसाने ही प्रतीक्षा संपवली असून ठोसेघर–चाळकेवाडी परिसराने हिरवाईचा शालू परिधान केला आहे. दाट धुके, रिमझिम पावसाच्या सरी आणि पक्ष्यांच्या मधुर किलबिलाटाने संपूर्ण परिसर नव चैतन्याने बहरला आहे.

ठोसेघरचा मुख्य धबधबा आता फेसाळत कोसळू लागला असून त्याच्या खालील गुहेजवळील धबधबाही प्रवाहित झाला आहे. हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटक ठोसेघरकडे आकर्षित होत आहेत. परिसरातील ओढे-नाले वाहू लागल्याने शेतकऱ्यांनी भात लागवडीच्या पूर्वतयारीला वेग दिला आहे. पावसाने उशिरा हजेरी लावली असली तरी जुलैच्या पहिल्याच आठवड्यात या परिसराला चिंब भिजवत निसर्गाचे मनोहारी रूप खुलवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT