हिरकणी वाघीण  
सातारा

‌Sahyadri Tiger Reserve : ‘सह्याद्री व्याघ्र‌’मध्ये तिसरी वाघीण

‌‘हिरकणी‌’मुळे कोयना अभयारण्यात नवसंजीवनी; जैवविविधतेला चालना

पुढारी वृत्तसेवा

कराड : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तिसऱ्या वाघिणीला (हिरकणी) शनिवारी यशस्वीरीत्या निसर्गमुक्त करण्यात आले आहे. या घटनेमुळे कोयना अभयारण्यात वाघ संवर्धनास मोठे बळ मिळाले असून कोयना अभयारण्यातील कोअर जंगल क्षेत्रात सुरक्षित स्थळी सोडण्यात आले.या वाघिणीस गुरुवार, 5 फेब्रुवारीला सायंकाळी 5 वाजता पेंच व्याघ्र प्रकल्पातील नागलवाडी वनपरिक्षेत्रातून पकडण्यात आली होते. त्यानंतर तिची वाहतूक सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात करण्यात आली. पुढे बोटीने प्रवास करून शुक्रवारी रात्री वाघीण कोयना अभयारण्यात आणण्यात आली. आगमनानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची सखोल तपासणी केली. तिला पाणी व मटण देण्यात आले असून ते तिने व्यवस्थित स्वीकारले. त्यानंतर शनिवार, 7 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजता वाघिणीला कोयना अभयारण्यातील कोअर जंगल क्षेत्रात निसर्गमुक्त करण्यात आले.

कोयना अभयारण्यात आधीच असलेल्या नर वाघ ‌‘बाजी‌’च्या जोडीला ही नवीन वाघीण दाखल झाल्याने येथील व्याघ्र अधिवास अधिक सक्षम होणार आहे. यामुळे भविष्यात पर्यटन व जैवविविधतेस चालना मिळण्यास मदत होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात पसरलेल्या 1165 चौरस किलोमीटर क्षेत्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून या यशस्वी मोहिमेने व्याघ्र संवर्धनास नवी दिशा मिळाली आहे. ही मोहिम क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपसंचालक किरण जगताप, सहाय्यक वनसंरक्षक बाबा हाक्के व त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडले. पेंचमध्ये आणलेल्या या वाघिणीला सह्याद्रीत गाईड मंडळींनी ‌‘हिरकणी‌’ असे नाव दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT