सातारा : सातारा शहर परिसरात चार ठिकाणी घरफोड्या झाल्या असून चोरट्यांनी अक्षरश: दिवाळी साजरी केली. विशेष म्हणजे लक्ष्मीपूजनावेळी पूजन केलेल्या दागिन्यांवरही चोरट्यांनी डल्ला मारला आहे. या घटनांनी शहर व उपनगरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
सदर बझारमध्ये सुमारे साडेसात लाखांची घरफोडी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घराचे लॉक तोडून अज्ञाताने आतील 7 लाख 42 हजार रुपये किंमतीचे सोन्या, चांदीचे दागिने लंपास केले. सातारा शहर पोलिस ठाण्यात जारा रफिक फरास (वय 21, रा. सदरबझार, सातारा) यांनी तक्रार दिली आहे.
दुसरी घटना गुरुवार पेठ, सातारा येथे घडली आहे. घरातून अज्ञात चोरट्याने सुमारे दीड लाखांच्या दागिन्यांची चोरी केल्याची तक्रार सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. गुरुवार पेठेतील गीतगोविंद अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली आहे. सातारा शहर पोलिस ठाण्यात वैशाली वासुदेव किरवे (वय 68, रा. गुरुवार पेठे, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. तिसरी घटना समर्थ नगर, एमआयडीसी परिसरात घडली आहे. घरात लक्ष्मीपूजनासाठी ठेवलेल्या दागिन्यांची अज्ञात चोरट्याने चोरी केली. 60 हजार रुपये किंमतीचे दागिने असून सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समर्थनगर, एमआयडीसी परिसरातील घराच्या किचनमधील स्लाईडींग खिडकी उचकटून अज्ञात चोरटा घरात घुसला. त्याने लक्ष्मीपूजनावेळी कलशाला घातलेले 60 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण चोरुन नेले. दि. 21 ऑक्टोबर रोजी रात्री ही घटना घडली. सातारा शहर पोलिस ठाण्यात गणेश मुकुंद वंजारी (वय 52, रा. समर्थनगर, एमआयडीसी, सातारा) यांनी तक्रार दिली आहे.
चौथी घटना सत्यमनगर सातारा येथे घडली आहे. अज्ञात चोरट्याने सुमारे आठ लाखांची घरफोडी केल्याची तक्रार सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सत्यमनगर, सातारा येथील घरामध्ये अज्ञाताने घुसून 7 लाख 98 हजार रुपयांच्या सोन्याची चोरी केली. सातारा शहर पोलिस ठाण्यात कल्पना संदीप सोनावणे (वय 47, रा. सेवागिरी नगरी, सत्यमनगर, सातारा) यांनी तक्रार दिली आहे.