सातारा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वराडे (ता. कराड) येथे एक महिन्यापूर्वी पहाटे एसटी बसमधील कुरिअर कंपनीच्या कर्मचार्याला मारहाण करून 92 तोळ्यांचे दागिने व 32 हजार रुपये असलेली बॅग अशी लूटमार झाली होती. या टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला. पोलिसांनी ड्रोनद्वारे वॉच ठेेवून चोरट्यांचा माग काढत भांब (ता. माळशिरस) येथून चार संशयितांना अटक केली. संशयितांकडून 76 लाख 94 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबतची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राहुल दिनेश शिंगाडे (रा. शिंगणापूर, ता. माण), महावीर हनुमंत कोळपे (रा. बिवी, ता. फलटण), अभिजित महादेव करे (रा. रावडी, ता. फलटण) व अतुल महादेव काळे (रा. भांब, ता. माळशिरस) अशी संशयितांची नावे आहेत. अन्य दोघे पसार आहेत. गुन्ह्यातील कार जप्त केली आहे. दि. 29 जुलै रोजी संशयित कारने कोल्हापूरला गेले. बसस्थानकावर रात्री साडेनऊच्या सुमारास कृष्णा कुरिअर कंपनीचा कर्मचारी कोल्हापूर ते मुंबई बसमध्ये बसला. याच बसमध्ये संशयितांचा एक पसार साथीदारही बसला. यानंतर संशयितांनी कारने बसचा पाठलाग केला. बस वराडे गावच्या हद्दीत आली. तेथे प्रवासी खाली उतरल्यावर राहूल शिंगाडे व अतुल काळे हे बसमध्ये गेले आणि तिघांनी कुरीअर कंपनीच्या कर्मचार्याला मारहाण करुन त्याच्या जवळील सोने व रोख रक्कम असलेली बॅग लांबवली.
या घटनेनंतर एलसीबीच्या पथकाला संशयित अतुल काळे व अभिजीत करे हे भांब, ता. माळशिरस येथील जंगलात लपल्याची माहिती मिळाली. दि. 24 रोजी पोलिसांनी ड्रोनने जंगलातील चोरट्यांचा ठिकाणा समजून घेतला. दि. 25 रोजी जंगलातून चालत येणार्या संशयितांना येत असताना पोलिसांनी अटक केली. संशयितांनी सांगितले, की महावीर कोळपे हा कोल्हापुरातील कृष्णा कुरिअरमध्ये नोकरीस होता. त्याला कंपनीचा कर्मचारी सोन्याचे दागिने कधी घेऊन जातो हे माहीत होते. या वरूनच सापळा रचून ही चोरी केली. दरम्यान, संशयितांना जिल्हा न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. संशयित अतुल काळे याने घराजवळील उकिरड्यात लपवलेले 92 तोळ्यांचे दागिने व सोन्याची बिस्कीटे पोलिसांना दिली.
या कारवाईमध्ये सपोनि रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, पोलीस अंमलदार साबीर मुल्ला, मनोज जाधव, प्रवीण कांबळे, अजय जाधव अमित झेंडे, प्रवीण पवार, संकेत निकम, अमृत कर्पे, विजय निकम, दलजीत जगदाळे, आनंदा भोई यांनी सहभाग घेतला.
चोरटे रात्री अडीच वाजता घरी येऊन जेवण न्यायचे
संशयित राहुल व महावीर हे महिनाभरापासून भालधोंडीच्या जंगलात लपले होते. गावात पोलीस असल्याने संशयित रात्री 2.30 ते 3 च्या दरम्यान घरी येऊन दोन वेळचे जेवण व पाणी घेऊन पुन्हा जंगलात जात होते. माहिती मिळताच पोलिसांनी ड्रोनद्वारे संशयितांवर वॉच ठेवला. यावेळी ड्रोनने हवेतून व पोलिसांनी पायी मार्ग काढत संशयितांना पकडले.