Theft Pudhari
सातारा

Umbraj theft case: उंब्रजमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; 6 दुकाने फोडली

कराड तालुक्यातील उंब्रज येथे चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून पाटण तिकाटणे परिसरात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री एकाच रात्रीत तब्बल सहा दुकाने फोडल्याची धक्कादायक घटना घडली

पुढारी वृत्तसेवा

उंब्रज : कराड तालुक्यातील उंब्रज येथे चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून पाटण तिकाटणे परिसरात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री एकाच रात्रीत तब्बल सहा दुकाने फोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी पहाटे एक ते दोन वाजण्याच्या सुमारास ही चोरीची मालिका घडली. चोरटे सुमारे तासभर परिसरात वावरत दुकाने लक्ष्य करत असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी प्रथम ओम मेडिकलचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला आणि सुमारे दहा हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. त्यानंतर शेजारील सिद्धनाथ मेडिकलचे दोन कुलूप तोडून शटर उघडण्यात आले. दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त करत तीन ते चार हजार रुपयांची चिल्लर व किरकोळ साहित्य चोरून नेण्यात आले. याच परिसरातील जी मोबाईल शॉपीचे कुलूप तोडून मोबाईल ॲक्सेसरीज व काही मोबाईल चोरट्यांनी लंपास केले. तर श्री गजानन मेडिकलचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यात चोरटे अपयशी ठरले. तसेच रुद्र पान शॉप आणि पायोनियर मेडिकलचीही कुलपे तोडण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकारात तीन चोरटे परिसरात वावरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. विशेष म्हणजे, परिसरात पूर्वी पोलिसांची नियमित रात्रगस्त असायची; मात्र अलीकडे ती बंद झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. यापूर्वी पंधरा दिवसांपूर्वी उंब्रज येथे एका ज्वेलर्सची सुमारे पंचवीस लाख रुपयांच्या मुद्देमालाची बॅग चोरट्यांनी लंपास केली होती. त्या घटनेतील आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नसताना आता पुन्हा सहा दुकाने फोडल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या सलग घटनांमुळे समोर चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. व्यापाऱ्यांनी वाढीव पोलिस गस्त व तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT