तासवडे टोलनाका : वहागाव ता .कराड येथील परिसरातील कृष्णा नदीकाठच्या विद्युत मोटरच्या केबल वायरी अज्ञातांनी कापून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. चोरट्यांनी सुमारे 30 हून अधिक शेतकऱ्यांच्या मोटरच्या वायरी कापून नेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अंदाजे चार लाखाहून अधिकचे नुकसान झाले आहे. सदरची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. मोठ्या प्रमाणात केबल वायरी चोरी झाल्यामुळे चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, बेलवडे हवेली, वहागाव घोंणशी परिसरातून कृष्णा नदी वाहते. शेतकऱ्यांनी कृष्णा नदीवरच मळी नावाच्या परिसरात शेतीला पाणी देण्यासाठी विद्युत पंप बसवले आहेत. विद्युत पंप नदीकाठी आहेत, तर स्टार्टर व बाकीचे उपकरणे नदीपासून सुमारे 100 ते 200 फूट अंतरावर लावण्यात आलेले आहेत. या परिसरात शेतकऱ्यांचे शेकडो विद्युत पंप आहेत. दिवसा या परिसरात शेतकऱ्यांचा वावर असतो. परंतु, रात्रीच्या सुमारास या परिसरात कुणीही फिरकत नाही.
दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी वहागावमधील मळी परिसरातील 30 हून अधिक शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाच्या केबल वायरी कापल्या आहेत. यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या 200 फूटपेक्षा अधिक केबल वायरी होत्या. त्यामुळे चोरट्याने अतिशय नियोजन पद्धतीने मोटार पेटी पासून ते विद्युत पंपापर्यंतच्या संपूर्ण केबल वायरीवरच डल्ला मारला आहे. तसेच काही शेतकऱ्यांचे मोटर पेटीतील स्टार्टर आणि ऑटोही लंपास केले आहेत. चोरट्यांनी सुमारे चार लाखाहुन अधिक रुपयांची केबल वायर चोरून नेल्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांपुढे पिके जगवण्याचे आव्हान...
कडक उन्हाळ्यात चोरट्यानी विद्युत पंपाच्या केबल वायरी चोरून नेल्यामुळे शेतकऱ्यांपुढे शेतीतील पिकांना पाणी देण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. चोरट्यांच्या या प्रकारामुळे शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे तळबीड पोलिसांनी चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.