फलटण : पुणे येथील स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या दुर्दैवी घटनेतील ती पीडित युवती फलटण शहर किंवा तालुक्यातील नसल्याची माहिती फलटणचे पोलिस उपअधीक्षक राहुल धस यांनी दिली.
तीन दिवसांपूर्वी पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात 26 वर्षीय युवतीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या घटनेचे संपूर्ण राज्यभर पडसाद उमटले होते. अत्याचार झालेली युवती फलटण तालुक्यातील असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. तालुक्यातील अनेकांनी या घटनेचा तीव्र निषेधही केला होता. अत्याचार करणार्या दत्ता गाडेला पुणे पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री अटकही केली आहे. पिडीत युवती घटना घडल्यावेळी स्वारगेट बसस्थानकात पहाटेच्या वेळी फलटणला जाणार्या बसची वाट पहात असल्याची माहिती मिळाल्याने तसेच अत्याचार घडल्यानंतर ती युवती फलटणला जाणार्या बसमध्ये बसून गेली होती. त्यामुळे ही पीडिता फलटणचीच असल्याचे सर्वांना वाटत होते. तसा सर्वत्र गवगवाही झाला होता. मात्र सदरची पीडित युवती फलटणची नसल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक राहुल धस यांनी फलटणच्या अधिकारी व्हाट्सअप ग्रुप वर दिल्याने तालुक्यातील जनतेतून पीडीतेच्या गावाबद्दल चाललेला तर्क वितर्क थांबला आहे.
दरम्यान, फलटण शहरासह तालुक्यातील विविध संघटना, संस्थांनी ‘त्या’ घटनेचा तीव्र निषेध केला आहे. तसेच पीडितेवर अत्याचार करणार्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी, अशा मागणीचे निवेदन रासप तसेच बहुजन समाजाच्यावतीने देण्यात आले आहे. फलटणच्या संगिनी फोरमनेही या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.