Dategad : दातेगडावरील तलवारीच्या आकाराची विहीर स्थापत्यकलेचा अद्भुत संगम file photo
सातारा

Dategad : दातेगडावरील तलवारीच्या आकाराची विहीर स्थापत्यकलेचा अद्भुत संगम

तब्बल २५ गड-किल्ल्यांच्या सातारा जिल्ह्यातील खडकात कोरलेली विहिर ठरतेय आकर्षण

पुढारी वृत्तसेवा

The sword-shaped well on Dategad: A marvelous blend of architectural styles

सातारा : विशाल गुजर जिल्ह्यातील पाटण तालुक्यात वसलेला दातेगड अर्थात सुंदरगड अप्रतिम स्थापत्यकलेचा संगम असलेला गिरीदुर्ग आहे. टोळेवाडी हे गडाच्या पायथ्याचे गाव असून, समुद्रसपाटीपासून सुमारे १,०२७ मीटर (३,२६० फूट) उंचीवर हा दुर्ग उभा आहे. गडावरील खडकात कोरलेली तलवारीच्या आकाराची विहीर हे येथील सर्वात मोठे आकर्षण असून, तिची रचना पाहून प्रत्येक पर्यटक थक्क होतो.

मराठ्यांची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्याला तब्बल २५ गड-किल्ल्यांचा समृद्ध वारसा लाभला आहे. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेत या दुर्गाचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले असून, दातेगड हा त्यापैकी एक वैशिष्ट्यपूर्ण किल्ला आहे. चारही बाजूंनी नैसर्गिक कातळतटांनी संरक्षित असलेला हा गड घेरा-दातेगड रांगेच्या दक्षिण टोकावर वसलेला आहे.

गडावरील सर्वात आकर्षक ठिकाण म्हणजे खडकात कोरलेली तलवारीच्या आकाराची विहीर. सुमारे ४४ पायऱ्या उतरून या विहिरीपर्यंत जाता येते. अंदाजे २५ ते ३० मीटर लांब, ३० मीटर खोल आणि दहा फूट रुंद असलेल्या या विहिरीचे स्थापत्य अचंबित करणारे आहे. जांभ्या दगडातून कोरलेल्या पायऱ्यांची रचना अत्यंत वैशिष्ट्वपूर्ण आहे. उतरताना उजव्या बाजूच्या पायऱ्या कमी उंचीच्या, तर डाव्या बाजूच्या अधिक उंचीच्या आहेत. त्यामुळे विशेषतः पावसाळ्यात येथे उतरताना काळजी घेणे आवश्यक असते.

विहिरीच्या भिंतीवर कोरलेले हत्तीचे शिल्प, शिवलिंग असलेली छोटी गुहा, नक्षीदार कमान आणि देखणा नंदी हे या स्थापत्याचे सौंदर्य अधिक खुलवतात. पाण्याजवळ उभे राहून वर पाहिल्यास संपूर्ण विहीर तलवारीच्या आकारात असल्याचा अनुभव येतो. विहिरीतील वातावरण कायम थंडगार असते; मात्र येथील पाणी पिण्यायोग्य नाही. पावसाळ्यात खुलणारे सौंदर्य पावसाळ्यात दातेगडाचे सौंदर्य अधिकच खुलते.

हिरव्यागार सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा दुर्ग इतिहासप्रेमी, दुर्गभ्रमंती करणारे व निसर्गप्रेमींसाठी पर्वणी ठरतो. साता-याहून टोळेवाडीमार्गे सुमारे ७० किलोमीटर, तर उंब्रज-पाटणमार्गे ८५ किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. पाटणपासून दातेगड अवघ्या सहा किलोमीटरवर आहे.

गडावरून दिसणारे निसर्गवैभव गडाच्या माथ्यावरून गुणवंतगड, मोरगिरी परिसर, सडा-वाघापूर, चाळकेवाडीच्या पवनचक्क्या, केरा नदीचे पात्र तसेच कोयना खोऱ्याचे विहंगम दृश्य दिसते. गडावर वाळ्याचे अवशेष, दोन मोठी पाण्याची टाकी, तटबंदी आणि भगवा ध्वज पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. गडाच्या पायथ्याशी असलेले भैरवनाथ मंदिरही पाहण्यासारखे आहे.

दोन मार्गानी जाता येईल दाते गडावर

दातेगडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला घेरा-दातेगडमार्गे, तर दुसरा टोळेवाडीमार्गे. टोळेवाडीचा मार्ग अधिक जवळचा असून, अवघ्या २० मिनिटांत गडावर पोहोचता येते. मुख्य प्रवेशद्वारापूर्वी डाव्या बाजूला एक छोटी गुहा दिसते. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोरच दगडात कोरलेल्या सुमारे सहा ते सात फूट उंचीच्या हनुमान व गणेशाच्या भव्य मूर्ती पाहायला मिळतात. या मूर्तीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरणे गणेशमूर्तीवर, तर सूर्यास्ताच्या वेळी हनुमानमूर्तीवर पडतात.

इतिहासाची साक्ष देणारा गड

दातेगडाचा इतिहास शिलाहारांच्या काळापर्यंत पोहोचतो. पुढे हा किल्ला बहामनी, आदिलशाही आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. अफझल खानाच्या वधानंतर महाराजांनी हा गड जिंकून त्याचे 'सुंदरगड' असे नामकरण केले. गडाची जबाबदारी साळुंखे (पाटणकर) घराण्याकडे सोपवण्यात आली. छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात संताजी घोरपडे आणि पाटणकरांच्या पराक्रमामुळे हा किल्ला मराठ्यांच्या इतिहासात विशेष महत्त्वाचा ठरला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT