वेळे : शेअर बाजारात गुंतवणूक करुन भरघोस परतावा मिळवून देण्याच्या अमिषाने वाई तालुक्याच्या ग्रामीण भागातही फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत. ग्रामीण भागालाही शेअर मार्केटचा डंख लागला आहे. 10 टक्के परताव्याचे अमिष दाखवून नागरिक व्याजाने पैसे काढून ते गुंतवू लागले आहे. मात्र, भामट्या एजंटांकडून दोन-तीन महिने पैसे दिल्यानंतर चालढकल करून नागरिकांना चुना लावला जात आहे. त्यासाठी नागरिकांनी सजग राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
शेअर मार्केटमधून जास्त परताव्याचे अमिष दाखवून लोकांची फसवणूक सर्वत्र सुरू आहे. आता याचे लोण वाईच्या ग्रामीण भागापर्यंत पोहचले आहे. यापूर्वीच शहरी भागातील कोट्यवधींची फसवणूक झाल्याने पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यानंतरही फसवणुकीचे प्रमाण काही केल्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. या घोटाळ्याची व्याप्ती शेंकडो कोटी रुपयांमध्ये आहे. बँका, पतसंस्था आणि पोस्टातील विविध योजनांमधील गुंतवणुकीचे व्याजदर कमी होऊ लागल्यामुळे दुसरा पर्याय म्हणून शेअर बाजाराकडे अनेकजण वळत आहेत. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास कमी काळात दामदुप्पट रक्कम तसेच जादा व्याज दराने पैसे मिळतील, असे आमिष गुंतवणूकदारांना दाखवले जातेय.
सामान्य नागरिकांनी तीन टक्के व्याजाने पैसे घेऊन एजंट भामट्याला देऊन त्याच्याकडून दहा टक्के घ्यायचे, अमिषाला ग्रामीण भागातील नागरिक बळी पडत आहेत. ज्यांनी गुंतवणूक केली त्यांना पहिले दोन हप्ते त्यांच्याच पैशात दिले जात आहेत. तिसरा हप्त्यानंतर एजंटांकडून गंडवागंडवी केली जात आहे. चालढकल होत आहे. यासाठी वाई पोलिसांनी शोध मोहिम राबवून भामट्यांचा पर्दाफाश करण्याची गरज निर्माण झाली आहे.