The 'Shivashastra Shauryagatha' exhibition will be inaugurated tomorrow
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यी वाघनखे Pudhari Photo
सातारा

‘शिवशस्त्र शौर्यगाथा’ प्रदर्शनाचे उद्या उद्घाटन

पुढारी वृत्तसेवा

सातारा : पुढारी वृत्तसेवा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त सातार्‍यातील श्री छत्रपती शिवछत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात इंग्लंडमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयातून वाघनखे आणण्यात आली आहेत. शनिवार, दि. 20 पासून ही वाघनखे पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे. याचबरोबर संग्रहालयात शिवशस्त्र शौर्यगाथा या शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालयाचे संचालक सुजितकुमार उगले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, खा. श्री. उदयनराजे भोसले, श्रीमंत संभाजीराजे छत्रपती यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. जिल्हा परिषद सभागृहात शुक्रवार, दि. 19 रोजी सकाळी 11 वाजता मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, खडतर परिस्थितीत आणि अग्निदिव्यातून ही वाघनखे इंग्लंडमधून भारतात येत आहेत. वर्षभर ही वाघनखे आणण्यासाठी विविध प्रक्रिया सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सुरू होत्या. सातार्‍यात होणार्‍या या प्रदर्शनात शिवकालीन शस्त्रांसह वाघनखांचेही दर्शन घेता येणार आहे.

या शिवशस्त्र प्रदर्शनात शिवकालीन शस्त्र दालन, वस्त्र दालन, नाण्यांचे दालन व इतर दुर्मिळ वस्तू पहावयास मिळणार आहेत. तलवारींचे विविध प्रकार, बंदुकीचे विविध प्रकार, भाल्यांचे विविध प्रकार, पट्टे, कुर्‍हाडी, कट्यारी, बाण, गदा अशी वेगवेगळी शस्त्रे पहावयास मिळणार आहेत. जिल्हा परिषद सभागृहात मुख्य कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. तसेच शस्त्र प्रदर्शनाची माहिती पुस्तिका व सिंधुदुर्ग, रायगड, शिवमुद्रा आणि भक्तीशक्ती संगम या विशेष टपालांचे अनावरणही या निमित्ताने होणार आहे.

पुढील सात महिने हे प्रदर्शन शिवभक्तांसाठी खुले राहणार आहे. हे प्रदर्शन शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत असून नागरिकांनाही अल्प दरात प्रदर्शन पाहता येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे व पुरातत्व संचालनालयाचे संचालक सुजितकुमार उगले यांनी सांगितले.

प्रदर्शन पाहण्यासाठी चार स्लॉट

शनिवार दि. 20 जुलैपासून हे प्रदर्शन सर्व नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात येणार आहे. वाघनखे सात महिने सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात राहणार आहे. सर्व दिवशी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत नागरिकांना शस्त्रे व वाघनखं पाहता येणार आहे. हे प्रदर्शन एकावेळी दोनशे लोकांना पाहता येणार आहे. दिवसभरातून यासाठी चार स्लॉट उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये पहिला स्लॉट विद्यार्थ्यांसाठी मोफत राहणार आहे. तर दुपारी 1 च्या पुढील उर्वरित तीन स्लॉट हे नागरिकांना नाममात्र शुल्क आकारून पाहण्यासाठी उपलब्ध राहणार आहेत. या प्रदर्शनाचा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

SCROLL FOR NEXT