सातारा : कुंभारवाड्यात घरोघरी व कारखान्यात गणेशमूर्ती बनवण्याची लगबग सुरू आहे.  Pudhari Photo
सातारा

कुंभारवाड्यात गणेशमूर्ती बनवण्याची लगबग

गणेशोत्सव अवघ्या महिन्यावर : डायमंड अन् धोतर नेसवलेल्या मूर्तींना मागणी

पुढारी वृत्तसेवा

सातारा : पुढारी वृत्तसेवा

श्री गणेशाच्या आगमनाला आता अवघा एक महिना राहिल्याने कुंभारवाड्यात लगबग सुरू झाली आहे. कुंभार बांधवांचे हात आकर्षक गणेशमूर्ती साकारण्यात गुंतले आहेत. शहरासह जिल्ह्यातील कुंभारवाड्यात घरोघरी व कारखान्यात गणेशमूर्ती बनवण्याची हातघाई दिसून येवू लागली आहे. यंदा डायमंड, फेटा व धोतर रेडिमेड नेसवलेल्या गणेश मूर्तीना बाजारपेठेत मागणी वाढली आहे.

यंदाचा गणेशोत्सव शनिवार, दि. 7 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे कुंभारबांधवांना गणेशमूर्ती घडवण्यासाठी लगबग सुरू आहे. उत्सवाला अवघा एक महिना राहिल्याने कुंभार बांधवांच्या घराघरांत, कारखान्यात वेगवेगळ्या स्वरूपांतील आकर्षक गणेशमूर्ती आकाराला येत आहेत. सध्या तयार गणेशमूर्तींवर अखेरचा हात फिरवण्याचे काम सुरू आहे. घरगुती आणि मंडळांच्या गणेशमूर्तींचे कोरीव काम केले जात आहे तर अनेक कुंभारांकडून कच्च्या गणेशमूर्ती परगावी पाठवल्या जात आहेत. मोजक्या घरांमध्ये मूर्तींचे रंगकाम सुरू झाले आहे.

यावर्षी घरगुती मूर्ती या एक फुटांपासून ते तीन फुटी आहे. यंदा साधारणपणे दीड हजार ते दहा हजार, तर मंडळांच्या मूर्ती दहा हजार ते लाखापर्यंत तयार होत आहेत. शाडू मातीच्या मूर्तींची यंदा संख्या वाढली आहे.भाविकांना आकर्षित करण्यासाठी बाप्पांच्या नवनवीन संकल्पनेतील मुर्त्या तयार करण्यात येतात. यामुळे कोर्‍या मूर्ती कारखान्यांमधून दाखल झाल्या आहेत. ऑर्डरनुसार या मूर्तींना गणेशभक्त व मंडळ कार्यकर्ते रंगकाम करून मूर्ती आकर्षक करण्यावर भर देत आहेत.

शाडू अन् कागद लगद्यांच्या मूर्तींना मागणी

नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी प्रबोधन झाल्याने गेल्या काही वर्षांत शाडूच्या आणि कागदाच्या लगद्याच्या मूर्तींना मागणी वाढली आहे. लालबाग, दगडूशेठ, मोरावरील गणेश, तुतारीवरील गणेश, झोपाळा गणेश, स्वामी समर्थ अवतार, चौरंग गणेश अशा फेटा, धोतर आणि डायमंड वर्क केलेल्या गणेशमूर्तीना सध्या मागणी मोठ्या प्रमाणात आहे. तर फेटाधारी, जय मल्हार, बालगणेशा, तांडव अवतार, शिवअवतार अशा गणेश मूर्तींना बच्चे कंपनीकडून घरगुती गणेश उत्सवासाठी विशेष मागणी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT