तासवडे टोलनाका : पुढारी वृत्तसेवा
पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे टोलनाका परिसरात रविवारी सांयकाळी जप्त करण्यात आलेले सोने व चांदी सुमारे ७ कोटी ५३ लाखांची असल्याचे तपासणीनंतर समोर आले आहे.
तसेच हे सोने व चांदी कोणत्याही एका व्यापाऱ्याची नसून यात चार ते पाच व्यापाऱ्यांच्या मालाचा समावेश आहे. विशेष म्हणजे सोने व चांदीसोबत इनव्हाईस असून या इनव्हाईसशी सोने व चांदी जुळते का ? याबाबतची तपासणी आयकर विभागाकडून सुरू आहे.
रविवार, २७ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी कराड ते सातारा जाणाऱ्या पुणे - बंगळूर महामार्गावरील लेनवर तासवडे टोल नाक्यावर एक कुरिअर वाहतूक करणारी गाडी अडवण्यात आली.
वाहनाच्या इनव्हाईसची तपासणी केल्यावर त्यात सोन्या-चांदीचे दागिने असल्याचे आढळले. या वस्तू इनव्हाईसप्रमाणे आहेत की नाहीत ? याची खात्री करण्यासाठी संबंधित गाडी तळबीड पोलीस ताब्यात घेतली आहे.
तसेच ही गाडी पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही निगराणीखाली सुरक्षित ठेवण्यात आली असून ज्यामध्ये विविध तपासणी पथकांचे सहकार्य घेण्यात आले. महामार्गावरील तपासणी पथकातील कर्मचाऱ्यांसह पोलीस, आयकर अधिकारी, कराड तहसीलदार आणि कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्या संयुक्त सहकार्याने करण्यात आली.
तपासणीमध्ये ९ किलो ३९० ग्रॅम सोने आणि ६० किलो चांदी असल्याचे निष्पन्न झाले असून त्याची अंदाजे किंमत ७ कोटी ५३ लाख रुपये आहे. सध्या आयकर विभागाकडून इनव्हाईसची पडताळणी सुरू आहे. तोपर्यंत सोन्या-चांदीचे दागिने पोलीस संरक्षणाखाली सुरक्षितपणे वाहनात ठेवलेले आहेत.
कराड उत्तर निवडणूक पथकाने या वाहनाची तळबीड पोलीस ठाण्यातून कराड कोषागारात सुरक्षितपणे नेण्याची जबाबदारी घेतली आहे आणि योग्य त्या सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तपासणी प्रक्रिया पूर्ण होताच पुढील माहिती दिली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.