सातारा : गौरी आवाहनामुळे बाजारपेठेत फळे व फुलांना चांगली मागणी राहिली. Pudhari Photo
सातारा

सातारा : गौरी-गणपतीच्या सरबराईमुळे फुलबाजार तेजीत

पुढारी वृत्तसेवा

सातारा : पुढारी वृत्तसेवा

घरोघरी गणपती बाप्पा व गौरी आगमन झाले असून त्यांच्या सरबराईसाठी भक्तगण सरसावले आहेत. सजावट, पूजा, महाआरतीमुळे प्रसादासाठी मिठाईबरोबरच फळांना मागणी वाढली आहे. गौरीच्या हळदी-कुंकू समारंभामुळे हार, वेणी, गजर्‍यांना मागणी वाढली आहे. तर बुधवारी गौरीच्या सजावटीमध्येही मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने फुलबाजार तेजीत राहिला. गौरींच्या फुलोर्‍यांसाठी पानपत्री व दुर्वा खरेदीसाठी झुंबड उडाली होती.

गणेशोत्सवातील गौरी आवाहन व गौरी पूजनाचे दोन दिवस अतिशय महत्वाचे असतात. गणपतीबरोबरच माहेरवाशीण गौरींचा दोन दिवस भरपूर पाहुणचार करण्यात येतो. त्यांच्या स्वागताबरोबर पाठवणीपूर्वी जागर व ज्येष्ठा गौरीचे खेळही घेतले जातात. तसेच हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन होते. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने शहरासह ग्रामीण भागातही गौरीपूजन जल्लोषात होत आहे. गौरी व गणपतीसाठी हार, वेण्या गजरे तसेच फुलोर्‍यासाठी पानपत्री, दुर्वा यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री झाल्याने फुलबाजार तेजीत आला आहे. झेंडू 150 ते 200, शेवंती 300 ते 500, गुलाब 500 ते 600, निशीगंधा 1000 ते 1200 रुपये किलोने विक्री झाली. उत्सव काळात फुलांची मागणी व दरही वाढल्याने फुलउत्पादक शेतकरी सुखावला आहे.

गौरींच्या फराळात मिठाईबरोबरच सर्वप्रकारच्या फळांना स्थान असल्याने फळांना मागणी वाढली होती. उत्सवाच्या पाश्वर्र्भूमीवर फळबाजारात फळांची आवकही वाढली आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत सातारा शहर व परिसरात फळे, फुले व पानपत्री विक्रेत्यांकडे खरेदीसाठी गर्दी झाली होती. गौरींच्या पुढे विढे घेतले जात असल्याने खाऊच्या पानांची खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली. गौरी आवाहन व पूजन या दोन दिवसांमध्ये फळे व फुलांच्या खरेदी विक्रीतून लाखोंची उलाढाल झाली.

महापूजा अन् भटजींची लगबग...

घरगुती गणेशोत्सवामध्ये प्रामुख्याने गौरी पूजनादिवशी सत्यनारायण महापूजेचे आयोजन केले जाते. आधीच गणेशोत्सव त्यात ज्येष्ठा व कनिष्ठा गौरींचे वास्तव्य असा शुभयोग जुळल्याने हा महापूजेचा योग साधन्यात आला. एकाच दिवशी अनेक ठिकाणच्या आर्डर असल्याने दिवसभरच पूजेसाठी भटजींची लगबग सुरू होती. नवीन व्यवसाय व शुभकार्याचा श्रीगणेशा करण्यासाठी देखील आजचा शुभमुहूर्त साधल्याने भटजींना मागणी वाढली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT