पाटण : पुढारी वृत्तसेवा
कोयना धरणांतर्गत विभागात पावसाचा जोर कमी झाला असून, धरणात येणार्या पाण्याची आवक घटली आहे. धरणातील मूळ पाणीसाठ्यात घट होऊ लागल्याने सहा वक्री दरवाजे सोमवारी रात्री चार फूट केले आहेत. धरण दरवाजातून 20 हजार, तर पायथा वीजगृहातून 2,100 असे एकूण प्रतिसेकंद 22,500 क्यूसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे.
धरणांतर्गत प्रतिसेकंद सरासरी 39,253 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणाचे सहा वक्र दरवाजे सोमवारी सकाळी साडेदहा फुटांवरून नऊ फूट केले. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता सहा फूट तर रात्री आठ वाजता चार फुटांवर आणण्यात आले आहेत. या चार फूट दरवाजातून 20 हजार तर पायथा वीजगृहातीतून 2,100 असे प्रतिसेकंद 22,100 क्युसेक पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. धरणात आता 86.11 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. मागील चोवीस तासांत धरणातील पाणीसाठा 0.52 टीएमसीने व पाणी उंची 7 इंचाने कमी झाली आहे. रविवार संध्याकाळी पाच ते सोमवार संध्याकाळी पाच या चोवीस तासात कोयना 59 मिलिमीटर, नवजा 53 मिलिमीटर, तर महाबळेश्वर 39 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.