कोयनेचे वक्र दरवाजे आज संध्याकाळी दीड फुटाने उचलणार file photo
सातारा

Koyana Dam Update | कोयनेचे वक्र दरवाजे आज संध्याकाळी दीड फुटाने उचलणार

पुढारी वृत्तसेवा

कराड : महाराष्ट्राची वरदायिनी मानल्या जाणाऱ्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. त्यामुळे बुधवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून आज सकाळी ८ वाजेपर्यंत १५ तासात तीन टीएमसीहून अधिक पाण्याची आवक कोयना धरणातील शिवसागर जलाशयात झाली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. आज संध्याकाळी ४ वाजता कोयना धरणाचे वक्र दरवाजे दीड फुटाने उचलण्यात येणार आहेत. यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बुधवारी सायंकाळी पाच वाजता कोयना धरणातील पाणीसाठा ७०.९६ टीएमसी इतका होता. त्यापैकी ६५.८४ टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा होता. रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. बुधवारी सायंकाळी धरणात ५५ हजार ५२२ क्युसेक पाण्याची आवक होत होती. धरणाच्या पायथा वीजगृहातून प्रतिसेकंद १ हजार ५० क्युसेक पाणी कोयना नदी पात्रात सोडले जात आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना येथे १६३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर नवजा आणि महाबळेश्वर येथे अनुक्रमे २३७ व २०७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

धरणात पाण्याची आवक वाढली

कोयना धरणात आज सकाळी ८ वाजता पाण्याची पातळी ६५१.००२ मीटर आहे. धरणात ७५ हजार २१५ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. तर कोयना नदीत १ हजार ५० क्युसेक विसर्ग सुरू आहे. आज संध्याकाळी चार वाजता कोयना धरणाचे वक्र दरवाजे एक फूट सहा इंचाने उचलण्यात येणार आहेत. वक्र दरवाजे उचलण्यात आल्यानंतर प्रतिसेकंद दहा हजार क्युसेक पाणी कोयना नदीत सोडले जाणार आहे. त्यामुळे धरणातून कोयना नदीत एकूण प्रतिसेकंद ११ हजार ५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होणार असून नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT