Tesla Satara Project  file photo
सातारा

Tesla Satara Project: ‘टेस्ला’च्या सातार्‍यातील प्रकल्पाला खो? केंद्रीय अवजड उद्योगमंत्र्यांच्या विधानाने चर्चेला उधाण

एलन मस्क यांच्या नेतृत्वाखालील इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) निर्माती कंपनी टेस्ला भारतात आपल्या वाहनांच्या उत्पादनास तयार नाही.

मोहन कारंडे

Tesla Satara Project

नवी दिल्ली : एलन मस्क यांच्या नेतृत्वाखालील इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) निर्माती कंपनी टेस्ला भारतात आपल्या वाहनांच्या उत्पादनास तयार नाही तर त्यांना देशात केवळ शोरूम उघडायची आहेत, असे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी सोमवारी स्पष्ट केले. अमेरिकेतील कर चुकवण्यासाठी टेस्ला भारतात उत्पादन करणार असेल तर ते योग्य नाही, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते. याकडे मंत्र्यांनी लक्ष वेधले. सातार्‍यात या प्रकल्पासाठी कंपनीकडून जागा शोधत असल्याचे सरकारी अधिकार्‍यांनी जाहीर केले होते.

ही ईव्ही कंपनी भारतात आपली वाहने विकण्यास इच्छुक आहे. पण ती इथे उत्पादन सुरू करू इच्छित नाही. ते फक्त शोरूम सुरू करण्यास अधिक इच्छुक आहेत, असे कुमारस्वामी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

आत्तापर्यंत त्यांनी (टेस्लाने) रस दाखवलेला नाही. इलेक्ट्रिक वाहन निर्मितीला चालना देणार्‍या योजनेसाठी पहिल्या फेरीच्या चर्चेत टेस्लाचा प्रतिनिधी सहभागी झाला होता. मात्र दुसर्‍या आणि तिसर्‍या फेरीत कंपनीचे कोणीही सहभागी झाले नाही, असे या प्रक्रियेची माहिती असलेल्या एका अधिकार्‍याने सांगितले. या कार्यक्रमात कुमारस्वामी यांनी भारतात इलेक्ट्रिक वाहन उत्पादनाला चालना देण्यासाठी नव्या योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांची घोषणा केली.

चार आंतरराष्ट्रीय कंपन्या भारतात ईव्ही उत्पादन करू इच्छितात

टेस्ला भारतात उत्पादन युनिटस् उभारण्यास उत्सुक नसताना, मर्सिडीज-बेंझ, स्कोडा-फोक्सवॅगन, ह्युंदाई आणि किया या कंपन्यांनी भारतात इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यास रस दाखवला आहे. सरकार आणि वाहन कंपन्यांमध्ये भारतात इलेक्ट्रिक वाहने उत्पादन करणार्‍यास चालना देण्यासाठी घेतलेल्या बैठकीत वरील चार कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

भारतात इलेक्ट्रिकल वाहन उत्पादनाला चालना देण्याची योजना गेल्या वर्षी जाहीर झाली. त्याची मार्गदर्शक तत्त्वे अलीकडेच जाहीर झाली आहे. त्यात सहभागी होण्याची मुदत अजून आहे. त्यात किती कंपन्या सहभागी झाल्या आहेत हे पाहणे महत्त्वाचे आहे. योजनेनुसार पात्र अर्जदारांनी भारतात किमान 4,150 कोटींची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. त्यात वाहन उत्पादनासाठी संपूर्ण तयार यंत्रे आयात करण्याची मुभा असून 35 हजार अमेरिकन डॉलर्स इतक्या आयातीवरील शुल्कात या योजनेनुसार सवलत देण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT