सातारा : सातारा जिल्हावासीयांसाठी खूशखबर आहे. जगप्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीची सातार्यात एंट्री होत आहे. या कंपनीकडून जिल्ह्यात इलेक्ट्रिक वाहनांचा सुटे भाग जोडणारा प्रकल्प (सीकेडी) उभारण्यासाठी जागा शोधत आहे. या कंपनीने मध्यम पदांसाठी नोकर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. गेल्या आठवड्यात टेस्ला इंडियाचे प्रमुख प्रसंथ मेनन यांनी राजीनामा दिला असून, आता टेस्लाच्या चीनमधील टीमकडे भारतातील इलेक्ट्रिक वाहन (EV) व्यवसायाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हैदराबाद स्थित मेघा इंजिनिअरिंगसोबतची बोलणी फिस्कटल्यानंतर सातार्यात युनिट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भारत आणि अमेरिका यांच्यात सध्या व्यापार करारावर चर्चा सुरू आहे. त्यामध्ये ऑटोमोबाईल्सवरील शुल्क सवलतीचा समावेश आहे. भारत 0-1 टक्के दराने गाड्यांचे पार्टस् आयात कर भरण्याचा प्रस्ताव देऊ शकतो. त्यामुळे अमेरिका तिच्या 25 टक्के शुल्कात सवलत देईल. या पार्श्वभूमीवर भारत SMEC (Scheme to Promote Manufacturing of Electric Passenger Cars in India)धोरणात बदल करण्याच्या तयारीत आहे. टेस्ला सध्या भारतातील एका दुसर्या नामांकित भागीदार कंपनीसोबत संयुक्त उद्योग स्थापनेच्या तयारीत आहे. टेस्लाकडून इलेक्ट्रिक वाहनांचा सुटे भाग जोडणारा प्रकल्प (सीकेडी) उभारण्यात येणार आहे. यामध्ये गाड्यांचे सुटे भाग आणून ते भारतातील कारखान्यात जोडले जातील. त्यामुळे आयात शुल्क कमी होते व स्थानिक उत्पादनाला चालना मिळते. टेस्लाची भारतातील एंट्री चालू आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत अपेक्षित आहे. कंपनीने मुंबईत एक शोरूमसुद्धा निश्चित केले असून, यावर्षी तेथून आयात गाड्यांची विक्री सुरू केली जाणार आहे.
दरम्यान, टेस्ला इंडियाचे प्रमुख प्रसंथ मेनन यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. त्यानंतर भारतातील ऑपरेशन्स टेस्लाच्या चीनमधील टीमकडे सोपवण्यात आली आहेत. टेस्ला सध्या अत्यल्प प्रसिद्धी असलेला पण जबाबदारीने व्यवहार करणारा भारतीय रिअल इस्टेट भागीदार शोधत आहे. ही प्रक्रिया मागील वर्षभरापासून सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. हैद्राबादस्थित मेघा इंजिनियरिंगसोबत चर्चा फिस्कटण्यामागे भूखंडात मोठा हिस्सा मिळवण्याबाबतची अट आणि इतर अटींवर एकमत न होणे ही प्रमुख कारणे होती. त्यानंतर सातार्याचा पर्याय पुढे आला आहे. सातारा जिल्ह्यात ऑटोमोबाईल्स संबंधित यंत्रणा आहेत. त्यामध्ये कूपर कॉर्पोरेशन इंजिन, जनसेट व ट्रॅक्टर उत्पादन कारखाने समाविष्ट आहेत.
पुण्यापासून 110 कि.मी. अंतरावर असलेल्या सातार्यात टेस्ला कंपनी युनिट उभारण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी मोठे भूखंड निश्चित करण्यात आले असल्याची सुत्रांची माहिती आहे. मात्र या प्रकल्पासाठी किती जागा लागेल किंवा लॉजिस्टिक याबाबत मात्र माहिती मिळू शकली नाही. टेस्लाचा सुरूवातीचा फोकस मुंबई, बंगळुरू आणि काही प्रमाणात दिल्ली याठिकाणी असेल. दिल्लीमध्ये एत क्षेत्र फारच प्रगत झाले आहे. टेस्लाच्या गाड्या आगामी 3-4 वर्षांत सामान्य खरेदीदारासाठी परवडणार्या नसतील. त्यामुळे दिल्लीचा प्राधान्यक्रम सध्या नसल्याचे एका अधिकार्याने सांगितले.
टेस्ला जॅग्वार व लँबोर्गिनीप्रमाणे स्वत:ची बाजारातील पोझिशन ठेवण्याच्या तयारीत आहे. या गाड्यांची किंमत सुमारे 60 लाखांपासून सुरू होईल. एंट्री लेव्हल मॉडेल हे मिनी कूपरसारखे असू शकते, ज्याची किंमत 50-55 लाख यादरम्यान असेल. टेस्ला भारतातील एत मार्केटचा वाढता संभाव्य ग्राहकवर्ग लक्षात घेऊन सावध पावले टाकत आहे. कंपनीने आतापर्यंत दोन डझनांहून अधिक मध्यम पातळीवरील पदांवर भरती सुरू केली आहे. त्यामध्ये स्टोअर, सेवा व ग्राहक व्यवहार व्यवस्थापकांचा समावेश आहे.
सातार्यात टेस्ला कंपनीने सीकेडी युनिट सुरू केल्यास जिल्ह्याच्या विविध क्षेत्रावर त्याचा सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. स्थानिक तरूणांसाठी तांत्रिक (कुशल) व अपतांत्रिक (अकुशल) नोकर्यांच्या संधी वाढतील. सहाय्यक सेवांमध्ये लॉजिस्टिक्स, सुरक्षा, कॅटरिंग आदींमध्ये रोजगार वाढेल. जागतिक दर्जाची कंपनी येण्यामुळे सातार्याची ओळख औद्योगिक नकाशावर ठळक होईल. इतर ऑटोमोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक्स कंपन्याही गुंतवणुकीसाठी सातार्याकडे आकर्षित होतील. औद्योगिक विकासामुळे रस्ते, वीज, पाणी आणि इतर औद्योगिक सुविधा उभारल्या जातील. ट्रान्सपोर्ट व लॉजिस्टिक सेवांचा दर्जाही सुधारण्यास मदत होईल. शेतकरी कुटुंबातील तरुणांना शाश्वत नोकरीच्या संधी मिळतील. औद्योगिक क्षेत्रात लागणार्या कौशल्यांसाठी आयटीआय, पॉलिटेक्निक व इतर प्रशिक्षण केंद्रे सुरु होऊ शकतात. कंपनीच्या सीएसआर अंतर्गत स्थानिक शिक्षण व आरोग्य क्षेत्रालाही मदत मिळू शकते.
चाकण हे भारतातील प्रमुख ऑटोमोबाईल हब मानले जाते. येथे मर्सिडीज-बेंझ, टाटा मोटर्स, महिंद्रा, व्होक्सवॅगन, बजाज यांसारख्या मोठ्या कंपन्यांची उत्पादन युनिटस् आहेत. राज्य सरकारने यापूर्वी पुण्याजवळील चाकण व चिखली येथील औद्योगिक पट्ट्यात टेस्लाला जागा देण्याची तयारी दाखवली होती. मात्र, हा प्रस्ताव मागे पडल्याचे समजते.
टेस्ला कंपनी सुरुवातीला गाड्यांचा साठा आयात करणार आहे. पूर्ण उत्पादन व्यवस्था उभी राहण्यास सुमारे 18 महिने लागणार आहेत. त्यामध्ये 6 ते 7 महिने परवानग्या व नियामक मंजुरीसाठी लागणार आहेत.