सातारा

Ramraje Nimbalkar | दहशत व खोटे दावे तालुक्याला परवडणारे नाहीत : आ. रामराजे

विकासाची घडी विस्कटू देऊ नका

पुढारी वृत्तसेवा

फलटण : धोम बलकवडी प्रकल्पाचे पाणी दुष्काळी पट्ट्यात आणल्यामुळे फलटण तालुक्याचे शेतीचे चित्र आमुलाग्र बदलले. पाण्यामुळे उसाचे क्षेत्र वाढले. तालुक्यात दोन कारखाने होते. दोनाचे चार कारखाने झाले. बंद पडलेला श्रीराम व साखरवाडी साखर कारखाना आटोकाट प्रयत्न करून सुरू केला. यामुळे तालुक्याचे अर्थकारण गतिमान झाले. शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य येण्यास मदत झाली. तीस वर्षांत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केला. मी केलेल्या विकास कामाचे श्रेय दिशाभूल करून दुसरेच कोणी घेत आहे. दिशाभूल, दहशत आणि खोटे दावे तालुक्याला परवडणारे नाहीत. विकासाची घडी विस्कटू देऊ नका, असे आवाहन विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सांगता सभेप्रसंगी बोलताना आ. रामराजे पुढे म्हणाले निरा-देवघर धरणासाठी धरणग्रस्तांची समजूत काढून धरण बांधण्यात आले. धरणग्रस्तांचे योग्य असे पुनर्वसन केले. त्यावेळी मोठी पायपीट स्वतः केली. 66 किलोमीटर पर्यंतचा निरा देवघरचा कॅनॉल मी पूर्ण केला. मध्यंतरी विदर्भ व मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी काही काळ निधी उपलब्ध न झाल्याने कामे थांबली होती. अनुशेषाच्या मुद्द्यामुळे या प्रकल्पांना निधी देता येत नव्हता. अनुशेषाचा मुद्दा कमी झाल्याने सदरची कामे पुन्हा सुरू झाली आहेत. मी केलेल्या कामाचे श्रेय काहीजण घेत आहेत.

आ. रामराजे म्हणाले, तालुक्यात रस्ते, पाणीपुरवठा, शैक्षणिक सुविधा, आरोग्य सुविधा, वीज या महत्त्वाच्या सुविधा मोठ्या प्रमाणात निर्माण केल्या. सुरवडी येथे एमआयडीसी सुरू करुन हजारो युवकांना रोजगार मिळवून दिला. कृष्णा खोरे महामंडळाची निर्मिती करुन महाराष्ट्राच्या वाट्याचे पाणी आडवण्याचे ऐतिहासिक काम केले. तालुक्यातील गटबाजी संपवली. तालुक्याला विकास मार्गावर आणण्याचे महत्त्वाचे काम केले. आता तुमचे भविष्य तुमच्या हातात आहे. माझं काम मी केलं. पाणी आणून दिले आहे. आता तुमचे काम तुम्ही करा. गफलत झाली तर नुकसान तुमचेच आहे.

गत 30 वर्षांत तालुक्यासाठी सर्वार्थाने काम करूनही माजी खासदार 30 वर्षांत मी काहीच केलं नाही, अशी टीका करतात. मग खासदारकीच्या पाच वर्षांत त्यांनी नेमकी कोणती विकास कामे केली ती तरी त्यांनी सांगावी, असेही आ. रामराजे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT