उंडाळे : कराड-चांदोली रोडवर उंडाळे-जिंती नाक्यावर टेम्पोने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला. शनिवारी रात्री साडेनऊ वाजता हा अपघात झाला. या अपघातात ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे कर्मचारी सुरेश हरिबा धाईगंडे (वय 41) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
कराड- उंडाळे - येवती - जिंती ला जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर सुरेश धाईंगडे हे शेवाळवाडीकडून रात्री साडेनऊच्या दरम्यान आपले काम आटोपून घराकडे निघाले होते. यावेळी त्यांनी मुख्य रस्ता क्रॉस केला व पुढे आले. परंतु कराडहून रत्नागिरीकडे भरधाव वेगाने जाणार्या टेम्पोने धाईंगडे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले.
त्यांना तातडीने कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचारा दरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर तातडीने ग्रामस्थ गोळा झाले. कराड-चांदोली रोडवर उंडाळे नजीक ग्रामस्थांनी अनेकदा भरधाव जाणार्या गाड्यांचा वेग कमी व्हावा यासाठी स्पीड ब्रेकर किंवा झेब्रा क्रॉसिंग करावे, अशी मागणी केली होती. पण बांधकाम विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे या परिसरात आजपर्यंत अनेक अपघात घडले आहेत. या सर्व अपघातांना बांधकाम विभाग जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. अपघाताची नोंद उंडाळे पोलिसांत झाली असून अधिक तपास सुरु आहे.