शहीद शुभम घाडगे यांचे अखेरचे दर्शन घेताना कुटुंबीयांना शोक अनावर झाला.  Pudhari Photo
सातारा

शहीद शुभम घाडगे यांना अश्रूपूर्ण निरोप

Satara News | कामेरीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार : लोटला जनसागर

पुढारी वृत्तसेवा

वेणेगाव : जम्मू-काश्मिरमधील पूंछ भागात नियंत्रण रेषेजवळ लष्कराची वाहने दरीत कोसळून झालेल्या अपघातात शहीद झालेले सातारा तालुक्यातील कामेरीचे वीरजवान शुभम समाधान घाडगे (वय 28) यांना विराट जनसागराच्या उपस्थितीत अश्रूचिंब निरोप देण्यात आला. ‘अमर रहे... अमर रहे... शहीद जवान शुभम अमर रहे!’, ‘जब तक सूरज चाँद रहेगा... जवान शुभम घाडगे आपका नाम रहेगा’ अशा घोषणा देत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबियांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.

वीर जवान शुभम घाडगे शहीद झाल्याने कामेरी परिसर हेलावून गेला. गुरुवारी दुपारी त्यांचे पार्थिव बेळगावहून कामेरी येथे सैन्यदलाच्या ताफ्यात आणण्यात आले. यावेळी देशमुखनगर फाटा ते फत्यापूर, कामेरी यादरम्यान जागोजागी शहीद जवान शुभम घाडगे यांना आदरांजली वाहण्यासाठी नागरिकांसह महिलांनी गर्दी केली होती. पार्थिव कामेरी येथील मुख्य चौकात ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठेवण्यात आले. त्यानंतर शहीद जवान शुभम घाडगे यांचे पार्थिव घरी अंत्यदर्शनासाठी नेण्यात आले. तसेच बोरगाव (सातारा) पोलीस व सैन्य दलाच्यावतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर सभामंडपात शहीद शुभम घाडगे यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी हजारोच्या संख्येने नागरिक, महिला, आबालवृद्ध अंत्यदर्शनासाठी जमले होते. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी व फुलांचा सडा टाकण्यात आला होता. झेंडूच्या फुलांनी व हारांनी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमधून शहीद जवान शुभम यांची अंत्ययात्रा निघाली.

यावेळी ‘अमर रहे अमर रहे शहीद जवान शुभम अमर रहे, जब तक सूरज चांद रहेगा शहीद जवान शुभम घाडगे आपका नाम रहेगा’ आदी घोषणा देण्यात आल्या. पोलीस व सैन्य दलाच्या जवानांच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकीच्या फैरी झाडून आणि बँडपथकातर्फे अंतिम बिगुल वाजवून मानवंदना दिली. यानंतर तिरंगा ध्वज कुटुंबीयांकडे सुपुर्द करण्यात आला. वीरपत्नी अर्चना, मुलगी साईशा, आई मनिषा, वडील समाधान व भाऊ संजय यांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतल्यानंतर भाऊ संजय यांनी पार्थिवाला मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार केले.

यावेळी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले, आ. मनोज घोरपडे, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, सातारा प्रांत अधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार नागेश गायकवाड, गट विकास अधिकारी सतीश बुद्धे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सतीश हंगे, सरपंच शुभांगी घाडगे यांच्यासह सैनिक कार्यालयाचे अधिकारी, बेळगाव युनिटचे कर्नल आदिंनी श्रद्धांजली वाहिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT