सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सध्या रेंगाळली आहे. राज्यातील अन्य जिल्हा परिषदेमधील शिक्षकांना कार्यमुक्त करुन बदली ठिकाणी शिक्षक हजर झाले आहेत. मात्र सातारा जिल्ह्यातील शिक्षकांना विजयादशमीचा तरी मुहूर्त लागणार का? असा प्रश्न पडला आहे.
सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदलीची प्रक्रिया सध्या सुरु आहे. सवंर्ग 1 मधील शिक्षकांची 18 जुलै रोजी पोर्टलवर आदेश निघाले तर संवर्ग 2 मधील दि. 25 जुलै रोजी, संवर्ग 3 मधील 4 ऑगस्ट रोजी, संवर्ग 4 मधील 14 ऑगस्ट रोजी तर संवर्ग 4 मधील विस्थापीत झालेल्या शिक्षकांचे 21 ऑगस्ट रोजी पोर्टलवर बदली आदेश निघाले. संवर्ग 3 मधील कराड, पाटण, जावली, महाबळेश्वर, सातारा या तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या शिक्षकांची बदली झाली असली तरी अद्यापही त्यांना बदलीच्या ठिकाणी सोडण्यात आले नाही. मात्र अद्यापही हे शिक्षक दुर्गम भागातच कार्यरत आहेत. शिक्षकांची बदली प्रक्रिया होवून सुमारे 1 ते 2 महिन्याचा कालावधी लोटला आहे.
राज्यातील 34 जिल्हा परिषदांपैकी सुमारे 16 ते 17 जिल्हा परिषद प्रशासनाने बदली शिक्षकांना कार्यमुक्त केले. ते शिक्षक नवीन शाळेवर हजरही झाले आहेत. मात्र सातारा जिल्ह्यातील बदली झालेल्या शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून कार्यमुक्त करण्याबाबतचा मुहूर्त विजयादशमीला निघणार का? असा प्रश्न शिक्षकांमधून उपस्थित केला जात आहे. मात्र काही संवर्गामधील शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्कीट बेंचमध्ये धाव घेतली असल्याचे समजते.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्याशी चर्चा करून सवर्ग एक मधील शिक्षकांना शाळा ऑफलाईन देऊन मग कार्यमुक्ती आदेश देणार आहोत. सोमवारी याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
सातारा जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांच्या कार्यमुक्तीबाबत जि.प. प्रशासन लवकरच निर्णय घेणार आहे. त्यानुसार कार्यवाही केली जात आहे.-अनिस नायकवडी, शिक्षणाधिकारी, प्राथमिक