तासवडे टोलनाका : पुणे-बंगळूर आशियाई महामार्गाच्या कराड तालुक्यातील तासवडे टोलनाक्यावर वाहन तपासणीदरम्यान रोख १५ लाख रुपयांची रक्कम मिळून आली. त्यानंतर सदरचे वाहन बोलेरो जीप व रोख रक्कम तळबीड पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. सपोनी किरण भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निवडणुक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री ही कारवाई केली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख व कराड पोलिस उपविभागीय अधिकारी अमोल ठाकूर यांनी जिल्ह्यात विशेष पोलीस पथकांची नियुक्ती केली आहे.
या पथकाकडून रस्त्यावर व महामार्गावर नाकाबंदी करून अचानक वाहन तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान, तळबीड पोलिस ठाण्याचे सपोनी किरण भोसले व त्यांचे सहकारी पोलिस शनिवारी मध्यरात्रीपासून अशियाई महामार्गावरील तासवडे टोलनाक्यावर वाहनांची तपासणी करत होते. रात्री २.३० वाजण्याच्या सुमारास एक संशयस्पद बोलोरो जीप आढळून आली. पोलिसांच्या पथकाने त्या जीपला थांबवत तपासणी केली असता, त्यावेळी त्या जीपमध्ये १५ लाख रुपयांची रोख रक्कम मिळून आली. त्यावेळी पोलिसांनी जीप चालकाची प्राथमिक चौकशी केली असता सदर बोलोरो जीप ही अहमदाबाद येथील असून, ते बेंगलोर होऊन अहमदाबादला निघाले होते.
तसेच चालकाचे औषधे बनवण्यासाठी लागणाऱ्या मशीनची कंपनी असून, ते मशीनची विक्री करतात. त्यामुळे १५ लाख रुपये मशीनचे पैसे असल्याचे चालकाने सांगितले. सदरची घटनेची माहिती पोलिसांनी वरिष्ठांना देतात वरिष्ठांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. यावेळी सदर रोख रक्कम व बोलोरो जीप सीसीटीव्हीच्या निगराणीसह ताब्यात घेण्यात आली आहे. तसेच रोख रक्कम ट्रेझरीत जमा करण्यात आली आहे. दरम्यान, ही रक्कम कुणाकडून व कशासाठी नेली जात होती याबाबत तळबीड पोलिस ठाण्याचे सपोनि किरण भोसले अधिक चौकशी करत आहेत. कारवाई तळबीड सपोनि किरण भोसले, पोलिस हवालदार सनी दीक्षित, सागर कुंभार, भोसले, मोरे, राठोड, पोलिस कॉन्स्टेबल कुंभार, संत्रे व चालक प्रवीण गायकवाड यांच्या पथकने केली.
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक २० नोव्हेंबरला होणार आहे. तसेच १५ ऑक्टोबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात आचारसंहिता सुरू आहे. दरम्यान, मतदारांना वेगवेगळे आमिष दाखवण्यासाठी नवनवीन फंडे वापरले जात आहेत. यामध्ये रोख रकमेचा मोठ्या प्रमाणात वारेमाप उपयोग करण्यात येत आहे; परंतु पोलिसांनी कडक धोरण अवलंबले असून अनेक ठिकाणी रोख रकमा व वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पोलिस विभाग सतर्क झाला असून २४ तास संपूर्ण पोलिस यंत्रणा ऑन ड्युटी आहे.