तासवडे ः याच टाकीमध्ये वेल्डिंग करत असताना विवेक पवार याचा गुदमरून मृत्यू झाला. pudhari photo
सातारा

तासवडे एमआयडीसीत वेल्डिंग करताना वहागावच्या युवकाचा गुदमरून मृत्यू

कंपनी मालक, कामगार ठेकेदासह चौघांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

तासवडे टोलनाका : तासवडे (ता. कराड) येथील एमआयडीसीत एका कंपनीत टाकीचे वेल्डिंगचे काम करत असताना आतमध्ये तयार झालेल्या धुरामुळे एका युवकाचा गुदमरून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मृत्यू झालेल्या युवकाचे नाव विवेक विजय पवार (वय 19, रा. वहागाव, ता. कराड) असे आहे. तर याप्रकरणी निष्काळजीपणा करणार्‍या कंपनी मालक श्रीकांत श्रीनिवास कुलकर्णी (रा. कराड), कामगार ठेकेदार मयूर हणमंत पवार (रा. चचेगाव), कामगार सचिन दिलीप पवार (रा. तांबवे) व संकेत नंदकुमार सूर्यवंशी (रा. बेलदरे) सर्व ता. कराड (जि. सातारा) यांच्याविरोधात तळबीड पोलिस ठाण्यात युवकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवार, 3 रोजी दुपारच्या सुमारास घडली.

घटनेत कुटुंबाला हातभार लावण्यासाठी तरूण वयात रोजगार करणार्‍या एकुलत्या एका मुलाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणार होता. घटनास्थळावरून मिळालेली थोडक्यात माहिती अशी की विजय पवार हे अनेक वर्षापासून कराडमध्ये रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करतात. दरम्यान कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीला हातभार लावण्यासाठी विजय पवार यांचा एकुलता एक मुलगा विवेक पवार हा काही दिवसापासून एमआयडीसीत रोजगार करण्यासाठी जात होता .तो एमआयडीसीत बी के इंजिनिअरिंग या कंपनीत कामगार ठेकेदार मयूर पवार यांच्याकडे रोजंदारीवर काम करत होता.

बी. के. इंजिनिअरिंग या कंपनीत स्टीलच्या मोठमोठ्या टाक्या बनवल्या जातात. शनिवारी नेहमीप्रमाणे विवेक पवार सकाळी कंपनीत कामासाठी गेला. त्याला एका मोठ्या टाकीचे आतून वेल्डिंग करण्याचे काम देण्यात आले होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास विवेक पवार मोठ्या टाकीत वेल्डिंग करण्यासाठी उतरला.

वेल्डिंग करत असताना टाकीमध्ये मोठ्या प्रमाणात धूर झाला होता. त्यावेळी विवेकने बाहेर येण्याचे प्रयत्न केला. परंतु धुरामुळे त्याला बाहेर पडता आले नाही त्यातच तो गुदमुरून टाकीत पडला. ही घटना घडल्याची कंपनीतील कामगारांना कळल्यानंतर त्यांनी तात्काळ कंपनीतील क्रेन आणली.आणि टाकीतून विवेक पवारला वर काढण्यात आले. वर काढल्यानंतर विवेक बेशुद्ध अवस्थेत होता.

त्यानंतर कामगारा ठेकेदार मयूर पवार आणि कंपनीतील लोकांनी विवेकला पुढील उपचाराकरिता कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलला हलविण्यात आले. या ठिकाणी आल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केली असता विवेकची प्राणज्योत मालवली असल्याची सांगितले. सदर घटनेची नोंद तळबीड पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT